| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानमधील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांची व्यवस्था करण्यासाठी आजही स्थानिक नागरिक आणि समाजबांधवांना वारंवार श्रमदान करावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्मशानभूमीतील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही नगरपालिकेची असताना गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांनाच पुढाकार घ्यावा लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
एखाद्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अंत्यविधीसाठी लागणाऱ्या लाकडांची धावपळ करावी लागते. त्यामुळे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना मित्र परिवार यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. ‘मृत्यूनंतरही मरणयातना’ अशी परिस्थिती माथेरानमध्ये निर्माण झाल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरवेळी स्थानिक नागरिक, समाजबांधव आणि काही सामाजिक कार्यकर्ते पुढे येत जंगल परिसरातील पडलेली लाकडे गोळा करून स्मशानभूमीत उपलब्ध करून देतात. मात्र, या श्रमदानामध्येही आर्थिक भार सहन करावा लागत आहे. सध्या स्मशानभूमीतील लाकडांचा साठा जवळपास संपलेला असून काही दिवसांत पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे आताच वन विभागाच्या सहकार्याने जंगलातील पडलेली वाळकी लाकडे जमा करून स्मशानभूमीतील गोडाऊन भरून ठेवावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याबाबत कोकणवासी समाज संस्थेच्यावतीने महिला अध्यक्षा सारिका पाटील, वनिता दिघे, मनिषा शिंदे गीता खाडे, समाज कार्यकारणी सदस्य तथा नगरसेवक किशोर मोरे, केतन रामाणे यांनी माथेरानच्या मुख्याधिकारी व नगराध्यक्षांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
स्मशानभूमीसाठी लाकडाच्या व्यवस्थेची मागणी
