सजग नागरिक मंच, सारथीचे महापौरांना निवेदन
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर परिसरात वाढते ध्वनी प्रदूषण आणि रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना होणारा जीवघेणा त्रास याविरोधात आता नागरिक एकवटले आहेत. ‘सजग नागरिक मंच’ आणि ‘सारथी’ या सामाजिक संस्थांनी एकत्र येत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांना सविस्तर निवेदन दिले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी जुलै 2025 मध्ये याच विषयासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यास प्रशासनाच्या कार्यसंकृतीनुसार कोणताही प्रतिसाद प्राप्त न झाल्याने आता थेट महापौरांकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.
सायन-पनवेल महामार्गावर दिवस-रात्र सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे बेलापूर परिसरातील निवासी भागांमध्ये ध्वनी प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमावलीपेक्षाही अधिक आवाज होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये हृदयविकार, तणाव आणि निद्रानाशाच्या समस्या वाढत असून, लहान मुलांच्या अभ्यासावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. यासाठी उड्डाणपुलांच्या निवासी भागाच्या बाजूने सुमारे 6 मीटर उंचीच्या ध्वनीशोषक धातूंच्या ‘नॉईज बॅरिअर’ उभाराव्यात, ॲशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, कोकण भवन परिसरातील महामार्ग आणि सीबीडी फायर ब्रिगेड परिसराला जोडणारा रस्ता ओलांडणे हे नागरिकांसाठी धोकादायक बनले आहे. वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे येथे अपघाताचा धोका वाढला असून, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी आधुनिक ‘अंडरग्राउंड पेडेस्ट्रियन टनेल’ उभारण्यात यावा, जेणेकरून पादचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित होईल तसेच वाहतुकीवरील ताणही कमी होईल, असा प्रस्ताव संस्थांनी मांडला आहे.
जनतेचा पैसा जनहितासाठी वापरा
सजग नागरिक मंचाने प्रशासनाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात अनेक ठिकाणी सुस्थितीत असलेले फूटपाथ तोडून पुन्हा नव्याने कामे केली जात असल्याची बाब निदर्शनास आणून देत, “जर हा पैसा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खिशातून जात असता, तर अशी उधळपट्टी झाली असती का?” असा सवाल करण्यात आला. जनतेच्या कररूपाने जमा होणारा पैसा हा नागरिकांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसाठी वापरला गेला पाहिजे. ध्वनी प्रतिबंधक भिंती आणि भुयारी मार्ग यांसारखी कामे हीच खरी स्मार्ट सिटी संकल्पनेची गरज असल्याचे संस्थांनी स्पष्ट केले.
‘नवी मुंबईला स्मार्ट शहर बनवताना केवळ सौंदर्यावर भर न देता नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. महापौरांनी या दोन्ही विषयांची तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता तपासून तातडीने कार्यवाही करावी, हीच आमची अपेक्षा आहे,’ असे सजग नागरिक मंच व सारथी संस्थेच्या वतीने निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
करदात्या नागरिकांचा विनियोग हा अनावश्यक कामासाठी न करता प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी डोळसपणे करावा. गटर-मीटर-वॉटर या संकुचित कार्यपद्धतीतून बाहेर पडत जनतेचा पैसा जनतेच्या सोयी सुविधांसाठी या पद्धतीने वापर करावा.
– अरुण कागले, सदस्य,
सजग नागरिक मंच नवी मुंबई
