| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबई शहरात अनावश्यक कामाच्या माध्यमातून होणाऱ्या निधीच्या अपव्ययाला पायबंद घालण्याबाबत, तसेच बेलापूर प्रभागातील विविध नागरी समस्या आणि प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने व ठोस कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी नवी मुंबईतील सजग नागरी मंचाने नवी मुंबई पालिकेचे शहर अभियंता शिरीष आरदवाड यांना लेखी निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद मुद्यांच्या अनुषंगाने सजग नागरिक मंचाच्या सदस्यांना तातडीने भेटीची वेळ देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
या निवेदनात सजग नागरी मंचाद्वारे शहर अभियंता यांना सांगण्यात आले की, आपण या पदावर नियुक्त झाल्यानंतर सजग नागरिक मंचाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत बेलापूर विभागातील नागरिकांच्या विविध समस्या, समाजोपयोगी कामांच्या मागण्या आणि स्थापत्य विभागातील निधीच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली होती. परंतु, त्या बैठकीनंतर दीर्घ कालावधी लोटूनही संबंधित विषयांवर कोणतीही ठोस, दृश्यमान किंवा समाधानकारक कार्यवाही झालेली नाही, हे अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक आहे. महापालिकेने केलेल्या खुलाशात, नागरिकांच्या गरजांना सर्वोच्च प्राधान्य देऊन स्थानिक अधिकारी नागरी कामे सुचवतात आणि वरिष्ठ अधिकारी त्या आवश्यकतेची पडताळणी करूनच कामांना मंजुरी दिली जाते, असे म्हटले आहे. जर महापालिकेची ही भूमिका प्रामाणिक असेल तर येथील रस्त्याच्या सिमेंटकरणाची, फुटपाथ दुरुस्तीची मागणी कोणत्या नागरिकांनी केली होती, त्याची माहिती जाहीर करावी. ज्या अर्थी सजग नागरिक मंचाने वर्षभराहून अधिक काळ मागणी केलेल्या नागरी कामांना महापालिका प्रशासन नजरेआड करत आहे, त्या अर्थी महापालिका प्रशासनाचा ‘नागरिकांची गरज लक्षात घेत कामांना मंजुरी’ हा पूर्णतः फसवा आणि दिशाभूल करणारा फतवा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन कंत्राटदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना आर्थिक फायदा देणाऱ्या कामालाच सर्वोच्च प्राधान्य दिले जाते आहे, असे निवेदनातून सांगण्यात आले.






