कार्यकर्त्यांची ग्वाही; गौडवाडीच्या विराट मेळाव्यामुळे शेकापत नवचैतन्य
| कोळा | वार्ताहर |
सांगोला तालुक्यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गौडवाडी येथे आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यामुळे गावोगावी नवचैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. स्व. आबासाहेब यांच्याप्रमाणे आम्ही देखील आमच्या जीवात जीव असेपर्यंत आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

गौडवाडी येथे शेतकरी कामगार पक्षाचा विराट मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा डाळिंबाचा हार घालून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी शेकाप चिटणीस दादाशेठ बाबर, दिपक गोडसे शिवाजीराव व्हनमाने यांच्यासह शेतकरी कामगार पक्षासह पुरोगामी युवक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आ. डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले, गौडवाडी गाव स्व. आबासाहेबांचे असून, या गावाने गेल्या 50 वर्षाच्या काळात शेकापसह देशमुख कुटुंबियांना भरपूर प्रेम दिले आहे. येणाऱ्या काळात देखील कुटूंबासह शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहून साथ द्यावी. मी स्वतः कार्यकत्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असून जर कोणी सर्वसामान्य कार्यकर्त्यावर दादागिरी, दमदाटी केली तर ती खपवून घेणार नसल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
हा मेळावा गौडवाडीतील 100 तरुण कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव झाला. या मेळाव्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कोळा ते गौडवाडी अशी भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यामध्ये तब्बल 750 मोटारसायकल सामील झाल्या होत्या. या मेळाव्यावरून आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे प्रचंड आकर्षण सांगोला तालुक्यातल्या जुन्या आणि युवा पिढीला आजही दिसून आले. कार्यकर्त्यांचा जोश, उत्साह, फटाक्याची आतषबाजी, हलग्याचा निनाद, लढण्याची हिंमत आणि ताकद या मेळाव्यात दिसून आली. जरी पुढारी पक्ष सोडून गेले तरी शेतकरी कामगार पक्षाची भिस्त आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर तशीच असल्याचे चित्र मेळाव्यात दिसून आले. मेळाव्याला संबोधित करताना आ.डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी आक्रमक भाषण करून नवचैतन्य निर्माण केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी कोळा जिल्हा परिषद गटातील गौडवाडी, जुनोनी, हातीद, जुजारपूर, कोळा हटकर, मंगेवाडी, काळू बाळू वाडी, गुणापवाडी, पाचेगाव बुद्रुक, कराडवाडी, कोंबडवाडी, तिपेहळी, किडबीसरी या भागातील सर्व नेते, कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले..
तोच जोश, तोच उत्साह
गौडवाडी येथे ऐतिहासिक भूमीमध्ये मध्यंतरीच्या घडामोडीमुळे पहिली बंडाची ठिणगी पडली. या ठिणगीचे रूपांतर वादळात झाले. त्यामुळे कोळा जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेने मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर अक्षरशः आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांना डोक्यावर घेतले. गेल्या पन्नास-साठ वर्षाचा तोच जोश, उत्साह पुन्हा दिसून आला.







