वादळी वाऱ्यामुळे बोटी बंदरात, प्रवासी वाहतुकही बंद
| उरण | प्रतिनिधी |
वादळी वाऱ्यांमुळे मासेमारीसाठी गेलेल्या अनेक बोटी अर्ध्या मार्गावरूनच परतल्या आहेत. हंगामातील ही नववी वेळ असून, वादळामुळे एकीकडे मच्छीमारांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे मासे नसल्याने खवय्यांच्या खिशाला चाट बसली आहे.
धोक्याच्या इशाऱ्यामुळे मोरा-भाऊचा धक्का, करंजा-रेवस आणि मुंबई-घारापुरी या तिन्ही मार्गांवरील प्रवासी बोटींची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. समुद्र खवळल्याने बंदरांवर धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा फडकवण्यात आला आहे. परिणामी, मासेमारीसाठी रवाना झालेल्या बोटींना परत बंदरात माघारी यावे लागले आहे.
करंजा आणि मोरा बंदरात 250 हून अधिक बोटी नांगरून आहेत. वादळामुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटींना अर्ध्यावरून परतावे लागल्याने सुमारे तीन लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च, डिझेल, बर्फ व इतर तयारीवर वाया गेला आहे. त्यामुळे मच्छीमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. वर्षभर संकटांचा सामना पावसाळ्यात 60 दिवस मासेमारी बंद असते. 1 ऑगस्टपासून हंगाम सुरू झाला असला तरी, यंदा खराब हवामानस वारंवार वादळांच्या इशाऱ्यांमुळे हवामान विभागाने आठ वेळा धोक्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे किमान 20 ते 22 दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली आहे. त्यामुळे वर्षभरात मच्छीमारांना विविध संकटांचा सामना करावा लागतो.







