गावठी हापूस आंब्यांना मागणी

। अलिबाग । वार्ताहर ।
सर्वांना आवडणारा ग्रामीण भागातील अस्सल हापूस आंबा कार्लेखिंड परिसरात मोठ्या प्रमाणात आला आहे. हे आंबे विक्रीसाठी आदिवासी महिला जागोजागी बसल्या असून यातूनच त्या उदरनिर्वाह करत आहेत. ग्रामीण हापूस आंब्याची 300 ते 400 रुपयांपासून विक्री होत आहे. अतिशय कष्टाळू आणि रोजगारासाठी सातत्याने मेहनत करणारा म्हणून आदिवासी समाजाकडे पाहिले जाते. आपल्या शेतामध्ये पिकवलेला हापूस आंबा या समाजातील महिला लहानग्या मुलांना घेऊन रस्त्याच्याकडेला विक्रीसाठी आणत आहेत. पहाटेच्या सुमारास अंधारातही डोक्यावर आंब्याची टोपली आणि हाताला मुले व दुपारचा जेवणाचा डबा घेऊन दोन तास पायी चालत येतात. गावठी हापूस आंबा नाक्यावर घेऊन बसतात. इतर आंबे विक्रेत्यांपेक्षा आदिवासी महिला मोठ्या प्रमाणात असतात. अनेक आदिवासी महिलांच्या शेतात आंबा पिकत नसला, तरी दुसर्‍याच्या वाडीतून तो विकत घेत व्यवसाय करतात. यावर्षी आंबा कमी आला असला, तरी खवय्यांनी मात्र चांगलाच ताव मारला आहे. त्यामुळे आदिवासी समाज सुखावला आहे.

Exit mobile version