दवावर पिकणाऱ्या भाज्यांना मागणी

। तळा । प्रतिनिधी ।

तळा शहरासह ग्रामीण भागात दवावर पिकणाऱ्या भाज्यांना तळा बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. भात काढणीनंतर तळा तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गावठी भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये मेथी, मुळा, पालक, माठ या भाज्यांचा समावेश असतो. सध्या दवावर पिकणाऱ्या या भाज्यांची बाजारात मोठी मागणी असून, तळा परिसरातील नागरिक या भाज्यांना पहिली पसंती देतात. यामध्ये मेथी, पालक, माठ, मुळा, चाकवत, कोथिंबीरचाही समावेश आहे. तळा शहरातील बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर दवावर पिकवलेल्या गावठी भाज्या पाहायला मिळतात, त्याची आवकही वाढली आहे. तळा परिसरातील ग्रामीण भागात हिवाळ्यात भाजीपाला उत्पादन घेतले जाते. सकाळच्या वेळी तळा शहर आणि बाजारात ही भाजी विक्रीला येते. तसेच, घरोघरी फिरूनही महिला भाजी विक्री करतात. यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक फायदा होतो. तळा तालुक्यात थंडीची चाहूल सुरू झाली असून, शेतकरीही मोठ्या प्रमाणावर दवावर पिकणाऱ्या या भाज्याचे उत्पादन घेत आहेत.

Exit mobile version