खरीप हंगामासाठी वीस हजार मेट्रीक टन खताची मागणी


| अलिबाग | वार्ताहर |

जिल्ह्यात 1 लाख 1 हजार 510 हेक्टरवर यंदा खरीपाची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी यावर्षी साधारणपणे 20 हजार मेट्रीक टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे.

प्रामुख्याने 98 हजार 487 हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर 3 हजार 023 हेक्टरवर नागली लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी 90 हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे 25 हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात जवळपास 22 हजार क्विंटल सुधारीत तर 250 क्विंटल संकरीत भात बियाणांचा समावेश आहे. कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.

खरिप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी देखील कामाला लागला आहे. पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे शेतकर्‍यांनी सुरु केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरु झाली आहेत. याशिवाय बांधबंदिस्ती, चर मारणे यासारखी कामे देखील सुरु झाली आहेत.

जिल्ह्यात वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, शेतमजूरांची कमतरता यावेळी दरवर्षी भातलागवडीखालील शेती क्षेत्रात घट होत आहे. भात लागवडीचे क्षेत्र 1 लाख 24 हजार हेक्टरवरून 1 लाख 1 हजार हेक्टवर येऊन ठेपले आहे. शेती क्षेत्रातील घट चिंताजनक आहे. शेतकरी शेतीपासून दूरावत चालल्याचे यातून दिसून येत आहे.

Exit mobile version