| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील रस्त्यांची अपूर्ण असलेली कामे मार्गी लावावीत यासाठी माथेरानमधील नगरसेवक नगरसेविका आणि कार्यकर्त्यांनी आ. महेंद्र थोरवे यांची भेट घेतली. शहरातील रस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने धूळ विरहित व्हावेत यासाठी आमदारांनी लक्ष घालावे अशी मागणी महिला लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी केली. त्याचवेळी शहरात सुरू असलेला घोडा आणि ई- रिक्षा यांच्या संघर्षातून मार्ग काढावा अशी मागणी या नगरसेवकांनी केली. यावेळी माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, मनोज खेडकर, ऐश्वर्या शिंदे, रिजवाना शेख, अर्चना भिलारे, लता ढेबे, कमल गायकवाड, सुरेखा साळुंखे, संगीता जांभळे, सुनील शिंदे, महापुले, गौंर्ग वाघेला यांनी आमदारांकडे विकास कामांवर शहरातील संघर्ष याचा परिणाम होत आल्याची माहिती दिली. शहरात महात्मा गांधी रस्त्यावरील क्ले पेव्हर ब्लॉक्सचे काम छत्रपती शिवाजी महाराज रोड असे पूर्ण करावे. तसेच कस्तुरबा रोड येथे क्ले पेव्हर ब्लॉक्सच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांचे पाय मुरगळून जखमी होतात याच रस्त्यावरून ई रीक्षा देखील जाते त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे नगरपालिका तुटलेले क्ले पेव्हर ब्लॉक्स बदलण्यात यावेत. सनियंत्रण समितीने 2014 मध्ये मातीची धूप थांबविणे आणि रस्ते धूळ विरहित करण्यासाठी मातीचें ब्लॉक्स रस्त्यावर बसविण्याचा झालेला निर्णय यांची अंमलबाजवणी करावी अशी मागणी केली.







