। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।
कळंबोली परिसरातील वाढत्या नागरी समस्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक रामदास वामन शेवाळे यांनी पनवेल महानगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या निवेदनात त्यांनी परिसरातील विविध मूलभूत समस्यांकडे लक्ष वेधले आहे. सेंट जोसेफ स्कूलच्या मागील बाजूस असलेले बाबा गार्डन सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून नागरिकांसाठी असुरक्षित बनले आहे. तसेच सेक्टर 6 येथील पाण्याच्या टाकीजवळील गार्डन देखील वापरासाठी अयोग्य झाले असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय, श्री अय्यप्पा मंदिराजवळून मुम्ब्रा रोडकडे जाण्यासाठी पादचारी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी सुरक्षित फूटपाथ उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.
कळंबोलीतील अनेक भागांमध्ये स्ट्रीट लाईट्स आणि हायमास्ट दिवे बंद किंवा खराब अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित लाईट्सची तात्काळ दुरुस्ती करून आवश्यक त्या ठिकाणी नवीन दिवे बसविण्याची मागणीही करण्यात आली आहे.
वरील सर्व समस्या या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असून पनवेल महानगरपालिकेने याची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेवक शेवाळे यांनी केली आहे.







