| नागोठणे | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला नागोठण्यात सध्या वेग आला आहे. नागोठणे शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या तिन्ही उड्डाण पुलांचे काम जोरात सुरू आहे. परंतु, असे असतांनाच महामार्ग चौपदरीकरण कामाचे ठेकेदार असलेल्या कल्याण टोल प्लाझाच्या अधिकाऱ्यांकडून काही महत्वाच्या ठिकाणी सर्व्हिस रोडवर गतिरोधक न उभारल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. हायवे नाका येथील भारत पेट्रोलियम पंपासमोर तातडीने गतिरोधक उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच, येथील खडक आळी भागातून महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर येताना वाहनांना मुंबई बाजूकडे जाणाऱ्या भरधाव वाहनांमुळे अपघाताचा धोका आहे. त्यामुळे येथील स्टेट बँकेच्या पुढील भागात असलेल्या सर्व्हिस रोडवरही तसेच इतर काही ठिकाणी पाहणी करून तेथे तत्काळ गतिरोधक उभारावा, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून होत आहे. तसेच, नागोठण्यातील तिन्ही उड्डाण पुलांचे काम जोरात सुरू असल्याने मुंबई व महाड बाजूकडे जाणारी सर्व वाहने या उड्डाण पुलांच्या दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवरूनच जात आहेत. त्यामुळे महामार्गावरून नागोठणे शहरात येण्या-जाण्यासाठी असलेल्या उड्डाण पुलाखालील अंडर पासमधून वाहनांना ये-जा करावी लागत आहे. मात्र, या तिन्ही अंडर पास मध्ये विशेष करून सहकारी भातगिरणी व स्टेट बँक समोरील उड्डाण पुलांच्या अंडर पास मध्ये कार, मोटारसायकल, रिक्षा अशी वाहने उभी करून ठेवण्यात येत असल्याने अंडर पास मधून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. तसेच, या ठिकाणी असलेल्या विविध व्यवसायाच्या टपऱ्या आता पुलाचे काम सुरू झाल्याने आता हटविण्यात याव्यात, जेणेकरून अंडर पास मधून जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होणार नाही, अशी मागणीही वाहन चालकांतून होत आहे.
अंडर पास मोकळे करण्याची मागणी
