सफाई कामगारांना न्याय देण्याची मागणी

| पनवेल | प्रतिनिधी |

नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असताना, अनेक वर्षांपासून या स्थानकांवर कार्यरत असलेल्या सुमारे 350 कंत्राटी सफाई कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामगारांनाही स्थानकांसह मध्य रेल्वेकडे हस्तांतरित करण्यात यावे, अशी मागणी आझाद कामगार संघटनेने केली आहे.

या मागणीसाठी आझाद कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कामगारांच्या रोजगाराचे संरक्षण व्हावे तसेच त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती संघटनेतर्फे करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी कामगारांची सद्यस्थिती, त्यांच्या सेवाकाळाची माहिती तसेच संबंधित कायदेशीर बाबी खासदारांना सविस्तरपणे समजावून सांगितल्या. अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकांच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या कामगारांना हस्तांतरण प्रक्रियेत वगळण्यात येऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. खासदार म्हात्रे यांनी निवेदन स्वीकारून कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेतर्फे देण्यात आली. यावेळी शेकापचे गटनेते नगरसेवक केतन भगत, अनंता म्हात्रे, बंटी पाटील, कामगार प्रतिनिधी नंदा कोळी, गीतेश गायकवाड, राकेश बारगोडे, शांताराम म्हात्रे, संदीप कोळी आणि अनिकेत भंडारे आदी उपस्थित होते.

Exit mobile version