| कोलाड | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गांवरील गोवे, पुई, पुगाव, मुठवली, सुकेली खिंड या ठिकाणी अपघात हे कुठे ना कुठे तरी घडतच आहेत. यामुळे प्रवासाच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत धोकादायक ठरत असून, वाहन चालकांच्या वेगाची नशा दिवसेंदिवस अपघाताचे मुख्य कारण ठरत आहे. यामुळे या ठिकाणी रस्त्याला गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झाली.
मुंबई-गोवा महामार्गावरील गोवे व पुई नाका येथे येण्या-जाण्यासाठी मार्ग बंद केला असून, गोवे येथील स्टॉपवरून कोलाडकडे जाण्यासाठी 500 मीटर पुढे जाऊन कुंडलिका नदीच्या पुलाजवळून पलीकडे जावे लागत आहे, तर कोलाडकडून पुई कॉलनीकडे जाताना याच मार्गाचा उपयोग केला जातो. यामुळे भरधाव वेगात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरून नम्रता गार्डन पुगाव येथून मढाली, डोळवहाळ, रेवेचीवाडी, ऐनवहाळ, गरभट विठ्ठलवाडी, अशी दहा ते बारा गावांतील नागरिक याच मार्गांवरून ये-जा करीत असतात. या सर्वच ठिकाणी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे या मार्गावरून येणारी वाहने मर्यादेपेक्षा वेगाने जात आहेत. ही वाहने अपघाताचे मुख्य कारण ठरत आहेत. यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. यामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याला गतिरोधक बसविण्यात यावा अन्यथा या महामार्गांवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
रस्त्याला गतिरोधक बसविण्याची मागणी
