वन टाइम टॅक्स अबाधित ठेवण्याची मागणी

। चिपळूण । प्रतिनिधी ।
चिपळूणमध्ये 22 जुलै पासून सलग तीन चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने अनेक पूरबाधितांची वाहने वाहून गेली आहेत, तर काही वाहनांची प्रचंड हानी झाली आहे.यासंदर्भात इन्शुरन्स कंपनीच्या स्तरावरुन हानी झालेल्या वाहनांच्या बदली नवीन वाहन किंवा इन्शुरन्सचा लाभ देण्यात येईल.परंतु अनेक वाहनधारकांनी वाहन खरेदी करतेवेळी वन टाइम टॅक्स भरला होता आणि सदरच्या टॅक्सची रक्कमही मोठी होती . त्यामुळे पूरग्रस्तांसंदर्भात कंपनीकडून वाहन बाधितांना वाहन देताना पूर्वी भरलेला टॅक्स ग्राह्य धरण्यात यावा तो अबाधित ठेवावा अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी पालकमंत्री अ‍ॅड अनिल परब तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

यामुळे पूर्वी भरलेल्या टॅक्सचा नवीन वाहनात समावेश केल्याने अशा ग्राहकांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार नाही,तरी पूर परिस्थितीत वाहनांची हानी झालेल्या अशा ग्राहकांना आर्थिक समस्येतून सावरण्यासाठी यासंदर्भात तातडीने कार्यवाही होण्याबाबत आ. निकम यांनी मागणी केली आहे.सदर पुरामध्ये हजारो वाहने पाण्याखाली गेल्याने त्रस्त नागरिकांनी सदरची मागणी झाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे.

Exit mobile version