विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी


उरण | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धंनजय गोंधळी यांनी केली आहे.

लोकनेते दि. बा. पाटील यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या जागेवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ उभे रहात आहे. या विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दयावे अशी मागणी येथील प्रकल्पग्रस्तांकडून जोर धरू लागली आहे. त्यासाठी वेळप्रसंगी उग्र आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला आहे. कारण येथील प्रकल्पग्रस्तांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. यावेळी तो कोणत्याही आमिषाला बळी न पडता प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने शेवटच्या क्षणापर्यंत लढत होते. त्यामुळे अशा लोकनेत्याचे नाव विमानतळाला देण्यास हरकत नाही.

उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या झालेल्या बैठकीत नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धंनजय गोंधळी यांनी केली. या मागणीस उपस्थित सर्व पदाधिकार्‍यांनी मान्यता दिली. यावेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष घन:श्याम कडू, पालू भिंडे, संजय गायकवाड, जे. एस. घरत, रा. ऊ. म्हात्रे व राजेंद्र नाईक आदी उपस्थित होते.

Exit mobile version