प्रवासी संघटना आक्रमक; आंदोलन छेडण्याचा इशारा
। मुरुड-जंजिरा । वर्ताहर ।
मुरुड येथील राजपुरी येथे असणारा सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पहाण्यासाठी शेकडोच्या संख्येने पर्यटक येत असतात. यावेळी पर्यटक आपली वाहने जेथे कायदेशीर वाहनतळ निर्माण करण्यात आले आहे तिथे वाहने पार्क करत नसून पर्यटक जिथे तिकीट काढतात त्याच ठिकाणी रस्त्यावरच वाहने पार्क केली जात आहेत. हे चुकीचे असून याला राजपुरी येथे नियुक्त केलेले बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा मुरुड तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत सुर्वे यांनी केला आहे. याबाबत प्रवासी संघटने मार्फत आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
श्रीकांत सुर्वे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत राजपुरी जेट्टीला भेट दिली. त्यांनी प्रत्यक्ष दर्शी पहाणी करून बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांची भेट घेऊन हा गलथान पणा दाखवून दिला आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रत्यक्ष स्थिती पहाता वाहन तळाला मोठी जागा उपलब्ध आहे. परंतु, येथील नियुक्त बंदर निरीक्षक यांच्या निष्काळजी कारभारामुळे पर्यटक ये-जा करत असतात त्या ठिकाणी वाहन उभे केल्याने पर्यटकांना उन्हात उभे रहावे लागत आहे. या निष्काळजी पणामुळे पर्यटकाला काही हानी पोहचली तर याला जबाबदार कोण, असा सवालही सुर्वे यांनी केला आहे. तसेच, राजपुरी बंदर निरीक्षकांनी तातडीने पर्यटकांची वाहने पार्किंग झोनमध्ये उभी करावी, अन्यथा मोठे जनआंदोलन छेडू, असा इशारा श्रीकांत सुर्वे यांनी दिला आहे. यावर बंदर निरीक्षक यांनी लवकरच हा मार्ग मोकळा करून दिला जाईल व जिथे वाहन पार्किंगची जागा आहे त्याच ठिकाणी वाहने उभी केली जातील, असे आश्वासन दिले आहे.