| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19मधील अंतिम भूमापन क्रमांक 639 सार्वजनिक गार्डनमुळे आर्टिकल 21 अंतर्गत हक्कांचे उल्लंघन होत असल्याने तेथील खेळणी काढून टाकण्याची मागणी अर्केश कुलकर्णी यांनी महापालिकेकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांना दिले आहे.
या निवेदनात अर्केश कुलकर्णी यांनी म्हटले की, मी पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 अंतर्गत येणाऱ्या भागातील रहिवासी आहे. आमच्या सोसायटीसमोर महानगरपालिकेची सार्वजनिक बाग आहे. या परिसरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. अलिकडेच या बागेत लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यात आली आहेत, त्यामुळे या ठिकाणी काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या बागेत सकाळपासून रात्री 11 वाजेपर्यंत प्रचंड आवाज, आरडाओरडा व घाणेरडे शब्दप्रयोग सुरू असतात. आजूबाजूच्या झोपडपट्टी आणि शेजारच्या चार सोसायट्यांमधील मुले कोणत्याही नियंत्रणाविना येथे येतात. त्याच कारणामुळे पूर्वी या बागेतील खेळणी काढण्यात आली होती. तसेच, या ठिकाणी सायकल आणि दुचाकी चोरीचे प्रकार देखील घडलेले आहेत. सध्या ही बाग 24 तास खुली असून याठिकाणी कोणतेही सुरक्षारक्षक किंवा देखरेख नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना शांततेत बसण्यास किंवा फिरण्यासही जागा उरलेली नाही. त्यामुळे या बागेतीली सर्व खेळणी तात्काळ काढून टाकण्यात यावीत. सात दिवसांच्या आत प्रत्यक्ष कारवाई न झाल्यास आम्ही लोकआयुक्त, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि माननीय न्यायालयात दाद मागू. त्यामुळे होणाऱ्या सर्व कायदेशीर परिणामांसाठी पनवेल महानगरपालिका व संबंधित वॉर्ड अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा अर्केश कुलकर्णी यांनी या निवेदनातून दिला आहे.
सार्वजनिक बागेतील खेळणी काढण्याची मागणी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606