वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी

| पनवेल | वार्ताहर |

करंजाडे वसाहतीपासून पनवेल रेल्वेस्थानकाला जोडणारी नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रम सेवेच्या बससेवेला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. करंजाडे ते पनवेल रेल्वेस्थानक या पल्यासाठी 11 रुपयांचे तिकीट भाडे असले तरी विलंबाच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले आहेत. या मार्गात सर्वात मोठी वाहतूक कोंडी पनवेल शहरातील उरणनाका चौक आणि स्थानक परिसरात तीन आसनी रिक्षांमुळे बस निघण्यासाठी प्रवाशांना विलंब होत असतो.

करंजाडे वसाहतीमधून एनएमएमटीच्या क्रमांक 76 बसला पनवेल स्थानकामध्ये पोहोचण्यासाठी अर्धा तासांचा विलंब होत आहे. उरणनाका येथील मासेबाजारामुळे उरण नाका येथे वाहतूक कोंडी होत आहे. पनवेल शहर वाहतूक पोलिसांच्या माहितीनुसार या दोन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस कर्मचारी व वार्डन तैनात केले आहेत. दररोज चुकीच्या पद्धतीने वाहने उभी केल्याने कारवाई पोलीस करत असतात. परंतु, पोलीस विभागाचा हा दावा पोकळ असून पोलीस कर्मचारी कारवाईसाठी तत्पर असल्यास वाहतूक कोंडी होतेच कशी, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे करंजाडे येथून एनएमएमटी बस वाहतूक कोंडीमध्ये अडकत असल्याने प्रवाशांनी तीन आसनी रिक्षातून प्रती आसन 20 रुपये देऊन करंजाडे ते पनवेल स्थानक या पल्यावर प्रवास करावा लागत आहे. मात्र, उरण नाका येथे तीन आसनी रिक्षांनासुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे.

वाहतूक पोलीस विभागाने पनवेल शहरातील उरणनाका येथील वाहतूक नियमनासाठी पोलीस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच, पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तीन आसनी रिक्षांनी चुकीच्या पद्धतीने रिक्षा उभी केल्याने काही रिक्षांवर दंडात्मक कारवाई केली असून पोलिसांचे कारवाईतील सातत्य सुरुच आहे.

संजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक विभाग
Exit mobile version