शटल सेवा सुरु करण्याची मागणी


| नागोठणे | वार्ताहर |

राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल आगारातून सध्या पनवेल ते पेण, पेण ते पनवेल पर्यंतच्या प्रवाशांसाठी पनवेल स्थानकातुन थोड्या-थोड्या वेळाने शटल सेवा सुरु करण्यात आली आहे. या शटल सेवेमुळे पनवेल ते पेण पर्यंतच्या अंतरातील प्रवाशांना या शटल सेवेचा उपयोग होत आहे. तसेच, प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादामुळे एसटीच्या उत्पन्नातही वाढ होत आहे. मात्र, असे असतांनाच पेण ते नागोठणे पर्यंतच्या प्रवाशांना मात्र या शटल सेवेचा उपयोग होत नाही. या शटल सेवेमुळे प्रवाशांना केवळ पेणपर्यंतच जाता येत आहे. त्यामुळे पेण ते नागोठणे पर्यंतच्या प्रवाशांना या शटल सेवेतून येऊनही पेण येथेच अडकून रहावे लागते. त्यामुळे पनवेल स्थानकातून सुटणार्‍या पनवेल ते पेण या शटल सेवेच्या काही गाड्या नागोठणेपर्यंत नेण्यात याव्यात जेणेकरून पेण ते नागोठणे पर्यंतच्या अंतरातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येईल.

तसेच, मध्य रेल्वेची रोहा ते पनवेल व पनवेल ते रोहा पर्यंतच्या प्रवासासाठी असलेली रेल्वे सेवा ही खूप वेळेच्या अंतराने असते. तसेच, या गाड्यांना नेहमीच गर्दी असल्याने काही प्रवाशांना रेल्वेत जागा मिळणेही कठीण होऊन जाते. त्यामुळेच नागोठणेहून पनवेलला व पनवेलहून नागोठणेला येणार्‍या-जाणार्‍या प्रवाशांनाही या शटल सेवेचा उपयोग होऊन एसटीचे उत्पन्नही वाढेल. त्यामुळेच पनवेलहून सुटणार्‍या काही शटलसेवा गाड्यांचा नागोठणेपर्यंत विस्तार करावा अशी लेखी मागणी नागोठणे प्रवासी संघटनेकडून पनवेल आगार प्रमुख व पनवेल स्थानक वाहतूक नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Exit mobile version