बस स्थानकातील रस्त्यासाठी पालकमंत्र्यांकडे मागणी

। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव बसस्थानकासमोर रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून हि समस्या गेली अनेकवर्षापासून असून परिवहन महामंडळाने याकडे पूर्णपणे डोळेझाक केली असून या रस्त्याच्या समस्येकडे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे लक्ष देतील काय? असा सवाल प्रवासी व नागरिकांनी उपस्थित केला आहे. सदर बस्थानकातील रस्त्याचे काम 31 ऑक्टोबर पर्यंत मार्गी न लागल्यास 1 नोव्हेंबर रोजी माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे बसस्थानकात येणार्‍या एस.टी गाड्या अडवून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा तालुका भाजपचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला. 25 दिवसांपूर्वी माणगाव आगार व्यवस्थापक,विधानसभा व विधानपरिषद विरोधी पक्षनेते,माणगाव डीवायएसपी,माणगाव पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यवर्ती असे दक्षिण रायगडातील महत्वाचे तालुक्याचे ठिकाण आहे.परिवहन महामंडळाने पडलेल्या या खड्ड्यांवर तीनवर्षापूर्वी तात्पुरती मलमपट्टी केली होती पण कायमचा हा प्रश्‍न सोडविण्यासाठी हे महामंडळ प्रयत्न करीत नाही. या बस स्थानकात मुंबई तसेच कोकणातून,पश्‍चिम महाराष्ट्रातून बसेस येत असतात. त्यांना माणगाव स्थानकात प्रवेश करताना या खड्ड्यांना तोंड द्यावे लागत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था होते.जागोजागी याठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले असून हा रस्ता खड्यात गेला आहे.

माणगाव हे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात येते. या मतदार संघातील माणगावच्या एसटी बस स्थानकातील रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पालकमंत्री दर आठवड्याला विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने माणगाववरून जात असतात.त्यांनी माणगाव बसस्थानकाला एकदा भेट देऊन येथील रस्त्याची पाहणी करणे आवश्यक आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संपर्क साधून पालकमंत्र्यांनी माणगाव बसस्थानकातील रस्ता लवकरात लवकर चकाचक करावा अशी मागणी प्रवासी व नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version