| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारावर एका स्थानिक नागरिकाने पक्के बांधकाम सुरू केले आहे. श्रीवर्धन चिखलप दांडगुरी मार्गे बोर्ली हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक 75 असून देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम श्रीवर्धन उपविभागाकडे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वप्रथम त्याला जुलै महिन्याच्या 22 तारखेला रस्त्यालगत गटारावर करीत असलेले बांधकाम तोडून टाकण्याबाबत नोटीस दिली होती. परंतु, त्याने नोटिसीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा एकदा 11 सप्टेंबर रोजी अनधिकृत बांधकाम करणाऱ्याला अंतिम नोटीसीची बजावणी केली असून ही नोटीस मिळाल्यापासून आठ दिवसांच्या आत बांधकाम तोडून घ्यावे, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे बांधकाम तोडून या तोडक कारवाईचा खर्च वसूल केला जाईल, अशा प्रकारे नोटीस बजावण्यात आली आहे. शोएब मोहम्मद शौकत अली पांगारकर असे अनधिकृत बांधकाम करणाऱ्याचे नाव आहे.







