भाजपा प्रदेश अध्यक्षाच्या दौऱ्यावेळी निदर्शने

शेकाप, महाविकास आघाडीतील पक्षांकडून करण्यात आले आंदोलन


| पनवेल | वार्ताहर |

भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवारी पनवेल दौऱ्यावर होते. महाविजय 2024 च्या अनुषंगाने हा संघटनात्मक दौरा होता, मात्र याच वेळी शेकापसोबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत निदर्शने केली. पालिकेवर असलेली सध्याची राजवट प्रशासकीय आहे की भाजपची पगारी राजवट आहे, असा हल्लाबोल आंदोलकांनी केला. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पनवेलमध्ये येणार म्हणून पनवेल शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे. यासाठी पालिका प्रशासनातील कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावण्यात आल्याचा आरोप शेकाप, महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला. शेकाप नेते गणेश कडू हे चांगलेच आक्रमक झाले होते. त्यांनी या कारभारावर जोरदार प्रहार केला. भाजपाचा असा मनमानी कारभार जनता कदापी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

आंदोलना प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांनी आपल्या हातात दुरुस्ती पूर्वीचे आणि दुरुस्ती नंतरचे फोटो झळकवले. आगामी लोकसभा निवडणुकीकरिता संपूर्ण देशभरात महाविजय 2024 अंतर्गत लोकसभा मतदार संघाची बांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपने राष्ट्रीय पातळीवर 400प्लस तर महाराष्ट्र राज्यात 45 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 33 मावळ लोकसभा मतदार संघात बुधवारी त्यांच्या दौऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Exit mobile version