। अलिबाग । प्रतिनिधी ।
वरिष्ठ अधिकार्यांच्या जाचातून महावितरण विभागातील अभियंता यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वरिष्ठांचा दबाव कामाच्या ताणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करीत अलिबागमधील महावितरण विभागातील कर्मचार्यांनी निषेध व्यक्त करीत कार्यालयासमोर निदर्शने केली. अलिबाग महावितरणच्या सबॉर्डीनेट इंजिनिअर्स असोशिएशन तर्फे आयोजित केलेल्या या आंदोलनात असंख्य कर्मचारी सहभागी झाले होते.
नांदेड येथील कार्यालयाअंतर्गत हिंगोली येथे सचिन कोळपे कार्यरत होते. एक ऑक्टोबर रोजी नांदेड येथील मुख्य अभियंता नांदेड डोये यांनी ऑनलाइन बैठक घेतली. या बैठकीत अभियंता सचिन कोळपे यांना अर्वाच्य भाषेत बोलून कारवाई करण्याची धमकी दिली. त्यामुळे कोळपे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते खुर्चीत कोसळले. त्यांना तातडीने हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून अगोदरच मृत असल्याचे घोषित केले. महावितरण विभागातील कर्मचारी अपुरे मनुष्यबळ असून देखील रात्रीचा दिवस करून सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्मचार्यांची रिक्त पदे न भरल्यामुळे कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. तरीदेखील शंभर टक्के कामाची अपेक्षा वरिष्ठ अधिकार्यांकडून केली जात आहे. या प्रकाराला कोळपे बळी पडून त्यांचे निधन झाले. वरिष्ठांच्या धमकी व जाचामुळे कर्मचारी व अधिकार्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची चिंता व्यक्त करीत या घटनेचे निषेध महावितरण कर्मचार्यांकडून करण्यात आला आहे. अलिबागमधील चेंढरे येथील कार्यालयासमोर अलिबाग विभागातर्फे सर्व अभियंत्यांनी घोषणा देत निदर्शने केली. महावितरणचे मंडळ सचिव श्रीपाद कुलकर्णी, विभागीय सचिव ओमप्रकाश सावडे, विभागीय अध्यक्ष निखीलेश शेंडे आदी पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.