दळवींची कृपा! निष्ठावंतांचे डिमोशन; अकार्यक्षमांचे प्रमोशन, कट्टर शिवसैनिकांची आगपाखड

। पेण । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. अलीकडेच अलिबागमधील शिवसैनिकांनी आमदारांच्या बेतालपणावर जाहीरपणे सभेत नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता पेणमधील कट्टर शिवसैनिकांचीही आमदारांच्या दुजाभावामुळे आगपाखड होत असल्याचे समोर आले आहे. अशातच गेली अनेक वर्षे कट्टर शिवसैनिक म्हणून काम करणार्‍या नरेश गावंड यांच्याकडील उपजिल्हाप्रमुखाचे पद काढून पेणमधील शिवसैनिकांनीच ठरवलेल्या अकार्यक्षम अशा नेत्याकडे ही जबाबदारी दिल्याने तालुक्यातील शिवसेनेला खिंडार पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

स्थानिक आमदारांच्या मनमानी कारभारामुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणचे शिवसैनिक पदोपदी दुखावत आहेत. अशातच आमदाराने पेणमध्ये दुजाभाव केल्याने पेणचे शिवसैनिक नाराज असल्याचे चित्र समोर आले आहेत. याबाबत कोणीही जाहीरपणे बोलण्यास तयार नसून, आमदाराविरोधात पेणचे शिवसैनिक छुप्या पद्धतीने बैठका घेत असल्याचे समोर आले आहे. विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनेचे खंदे कार्यकर्ते नरेश गावंड यांचे उपजिल्हाप्रमुख हे पद काढण्यात आले आहे. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, स्थानिक आमदारांची मर्जी संपादित केलेले, तसेच गावंड यांचे स्नेही असणारे अविनाश म्हात्रे यांना हे पद देण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी तालुक्यातील शिवसैनिकांनी अविनाश म्हात्रे अकार्यक्षम असल्याचे सांगत त्यांच्याविरोधात सह्यांची मोहीम राबविल्याचे एका शिवसैनिकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे. त्यामुळे परिसरात उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

याशिवाय, पेण तालुक्यामध्ये बाहेरील नेतृत्वाने लुडबुड केल्याचे पेणच्या शिवसैनिकांना मान्य नव्हते. त्यातच पेणचे शिवसैनिक हे माजी खासदारांच्या गटातील विश्‍वासू असल्याची चर्चा आहे. यामुळे कळत-नकळत विद्यमान आमदारांची वक्रदृष्टी पेण येथील काही पदाधिकांर्‍यावर होती. या परिस्थितीत आज ना उद्या काही पदाधिकार्‍यांची पदे काढली जातील, अशी चर्चा रंगत असतानाच नरेश गावंड यांच्या पदच्युतीची घोषणा झाली. मात्र, यामुळे स्थानिक आमदारांविरुद्धचा शिवसैनिकांमधील संताप अधिकाधिक उफाळत आहे. याच पार्श्‍वभूमीवर नरेश गावंड समर्थकांची अज्ञातस्थळी बैठक होणार असून, यामध्ये आमदारांविरुद्ध काही निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी पुढे काय होणार, याकडे पेणवासियांसह सार्‍याच जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आंदोलनाचा फुसका बार
साधारणतः दोन महिन्यांपूर्वी राणाभीमदेवी थाटात स्थानिक आमदारांनी प्रसार माध्यमांसमोर जेएसडब्ल्यू स्टील कंपनीविरुद्ध आंदोलन छेडण्याची घोषणा केली होती. परंतु, वरिष्ठांच्या मध्यस्थीने आंदोलनाची हवाच निघाली. तसेच उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड हे जेएसडब्ल्यू कंपनीचे कामगार असल्याने त्यांनी अप्रत्यक्ष कंपनीच्या आंदोलनात सहभाग न घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात होते. त्यामुळे कळत-नकळत आमदार साहेब दुखावले होते. त्याचाच बदला आमदारांनी घेतला की काय? अशी चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.

Exit mobile version