जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सलाईनवर
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
रायगड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला आहे. जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीत 282 हून अधिक डेंग्यूचे रुग्ण सापडले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेची धावाधाव सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सलाईवर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात ग्रामीण भागातील लोकसंख्या सुमारे 16 लाख 64 हजार असून, जिल्ह्यात गावे, वाड्या सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा मजबूत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अखत्यारित 55 आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद दवाखाने, 280 आरोग्य उपकेंद्र आहेत. या संस्थांमार्फत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केला जातो. जिल्ह्यात एक जिल्हा सामान्य रुग्णालय, सहा उपजिल्हा रुग्णालय व आठ ग्रामीण रुग्णालये आहेत. या संस्थाच्या मदतीने शहरी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न होत असतानादेखील जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. अलिबाग, पनवेल, पेण आदी तालुक्यांतील नागरिकांना डेंग्यूची लागण मोठ्या प्रमाणात आहे. दरदिवशी 15 ते 35 रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत असल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची धावपळ उडाली आहे. जुलै महिन्यात 144, तर ऑगस्ट महिन्यात 138 रुग्ण सापडले आहेत. यातील काही रुग्ण बरे झाले असून, काही रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर येत आहे. अलिबाग व रेवदंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडलेले पाच रुग्ण उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आठ जणांचा मृत्यू
रायगड जिल्ह्यात जानेवारीपासून ऑगस्ट या आठ महिन्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण कमी असले, तरीही हे रुग्ण वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
दर बुधवारी पाळणार कोरडा दिवस
रायगड जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. डासांची उत्पत्ती वाढू नये यासाठी हिवताप कार्यालयाने कंबर कसली आहे. फवारणीसह औषधोपचार केले जात आहेत. बैठकांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेने यावर्षी डेंग्यूचे रुग्ण अधिक सापडत आहेत. त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. परंतु, त्यावर वरच्या पातळीवर तपासणी सुरु आहे. डेंग्यूला रोखण्यासाठी दर बुधवारी जिल्ह्यात कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. राजाराम भोसले यांनी दिली.
आरोग्य विभागाचा चालढकलपणा
जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याबाबत आरोग्य अधिकारी विखे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मी बाहेर आहे, जयस्वाल यांच्याकडे माहिती आहे,’ असे सांगितले. त्यानंतर ही माहिती घेण्यासाठी जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, हिवताप कार्यालयाकडे ही माहिती असल्याचे सांगून आपल्याकडील जबाबदारी हिवताप कार्यालयाकडे ढकलण्याचा प्रकार केल्याचे दिसून आले.