| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील उच्चशिक्षित तरुणाचा डेंग्यूने बळी घेतला आहे. वकिलीची सनद याचवर्षी मिळविलेल्या मुस्तफा तथा राजू रफिक अत्तार असे त्या तरुणाचे नाव असून, बोंबील आळी येथे त्यांचे कुटुंब राहते.
नेरळ गावातील जुनी बाजारपेठ बोंबील आळीमधील रहिवासी रफिक अत्तार यांचा सुपुत्र मुत्सफा हा काही दिवस ताप आणि अंगदुखी आजाराने त्रस्त होता. त्यामुळे त्यांना नेरळ गावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केले. मात्र, मुस्तफाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने डॉक्टरांनी सदर तरुणाची 11 सप्टेंबर रोजी पांढर्या पेशीसंदर्भातील रक्त तपासणी करण्यास सांगितल्याप्रमाणे रक्त तपासणी केली असता रिपोर्ट नॉर्मल आले होते. मात्र, 12 सप्टेंबर रोजी डेंग्यू आणि पेशीसंदर्भातील रक्त तपासणी केली असता डेंग्यूचे निदान समोर आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, तेथे उपचार घेत असताना मुस्तफाच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर 13 सप्टेंबरच्या दिवशी अचानक मुस्तफाची प्रकृती खालवल्याने त्याला नेरळ येथून बदलापूर येथे रुग्णवाहिकेतून नेले जात असताना रस्त्यातच त्याची प्राणजोत मालवली.
या घटनेची माहिती ही नेरळ प्राथमिक आरोग्य विभागाला मिळताच आरोग्य विभागाने या तरूणाच्या घरातील व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेतले असल्याचे त्या परिसरात आजारी व्यक्तींच्या रक्त तपासणी संदर्भातील 14 दिवसांचे रक्त तपासणी सर्वेक्षण सुरू केल्याचे तसेच सदर तरुणावर उपचार करणार्या डॉक्टरांना मयत तरूणावर केलेल्या उपचारासंदर्भातील कागदपत्रे सादर करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
आम्ही सदर घटना घडल्यावर तात्काळ नेरळ गावातील जुनी बाजारपेठमधील मशिदीपासून सानेवाडापर्यंत 2000हून अधिक लोकांच्या आरोग्य तपासण्या पूर्ण केल्या आहेत. त्यात कुठेही कोणताही रुग्ण डेंग्यूसदृश्य आजाराने बाधित नाही, असे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मृत तरुण हा मुंबई नेरळ असा दररोज प्रवास करीत होता आणि त्यामुळे मुंबई येथे कामाच्या ठिकाणी त्याला डेंग्यूसदृश्य लागण झाली काय? याचा शोध घ्यावा लागणार आहे.
– डॉ. नितीन गुरव, तालुका आरोग्य अधिकारी