वातावरणात वाढला गारवा
| चिपळूण | प्रतिनिधी |
नोव्हेंबर महिन्यामध्ये अखेर कोकणामध्ये धुके पडायला सुरुवात झाली आहे. ‘धुक्यांनी सजली सकाळ’ असे दृश्य आता नदीलगत आणि डोंगर रांगांवरती सगळीकडे पहावयास मिळत आहे. थंडीची चाहूल लागली असून कामथे घाटात धुक्याचे दृश्य पाहताना मन मोहून जाते. वातावरणातील गारवा सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे. आता गावागावात शिकोट्या पेटवण्यास सुरूवात झाली आहे. थंडीचे दिवस सुरू झाले की निश्चित सारी सृष्टी दव बिंदूनी भिजली जाते आणि धुक्याची चादर सर्वत्र पांगरली जाते. असेच दृश्य आता पहावयास मिळत आहे. धुक्यात हरवलेली सृष्टी आणि निसर्ग सौंदर्य पाहताना निश्चित या थंडीच्या दिवसांमध्ये मनाला वेगळाच आनंद प्राप्त होतो.
चिपळूण येथील कामथे घाटात गेल्या आठ दिवसांपासून सकाळी दाट धुके पसरलेले असते. हे धुक्याचे दृश्य किमान सकाळी नऊ वाजेपर्यंत तरी दिसून येते. धुक्यातून वाट काढताना एक वेगळाच निसर्ग सौंदर्याचा नजारा बघायला मिळतो. धुके दाट पडत असल्याने त्यातून वाहन चालक यांना गाडीचे लाईट लावण्याशिवाय पर्याय उरत नाही. समोरून येणारी वाहन सुद्धा या धुक्यातून दिसत नाहीत. कदाचित अशावेळी अपघात होण्याच्या घटनाही घडू शकतात. दाट धुक्याने कोकणातील घाट रस्ते एक वेगळ्या सौंदर्याने खुलून दिसत आहेत. वळणावळनात धुक्यात हरवलेले रस्ते हे दृश्य जणू डोळ्यात साठवून ठेवावे असेच आहे. आता गुलाबी थंडीच चाहूल सर्वत्र लागली आहे. त्यामुळे प्रत्येक जण उबदार स्वेटर खरेदीसाठी सुद्धा बाजारामध्ये गर्दी करत आहे.
कोकणात ज्या ज्या ठिकाणी घाट रस्ते आहेत. अशा सुंदर ठिकाणी धुके पडल्यानंतर एक वेगळा नजराणा आपल्याला बघायला मिळतो. डोंगर भागातील हिरवीगार झाडी यामध्ये धुके पडल्यानंतर त्यावर टाकणारे दवबिंदू यांनी निसर्गाचे सौंदर्य अजूनच खुलते. याचा आनंद सुद्धा निसर्गप्रेमी घेत आहेत. काहीजण हे विहंग दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवण्यासाठी सकाळी बाहेर पडतात.
