| म्हसळा | वार्ताहर |
रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हदरला असून, या घटनेमुळे तालुक्यातील शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने म्हसळा तहसीलदार समीर घारे यांनी गुरुवारी तालुक्यातील अनेक गावांचा सर्वे केला. यामध्ये देवघर कोंड या गावातील घरे ही दरड भागात येत असून, यातील अकरा घरांना दरडीचा धोका वाटत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी त्या अकरा घरांपैकी सात घरातील नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या.
दरम्यान, या गावाचा जीएसआय सर्व्हे करावा, अशी मागणी तहसीलदार समीर घारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. देवघर कोंड येथे सुमारे 180 घरे आहेत. म्हसळा शहरानजीक डोंगराच्या कुशीत हे गाव वसलेले आहे. गेले सात ते आठ दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर देवघर कोंड येथे संभाव्य दरडग्रस्त गावाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार समीर घारे त्यांचा कर्मचाऱ्यांसमवेत गावाला समक्ष भेट दिली. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला व गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याचे आदेश दिले.