शिक्षण विभागाने फटकारले, ‘डेक्कन’ ताळ्यावर

शाळा सुरु ठेवण्याचा अहवाल दोन दिवसात देण्याची सुचना

। अलिबाग । प्रतिनिधी ।

पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित कुरुळ येथील आरसीएफ कर्मचारी वसाहतीमध्ये गेली 43 वर्षे शाळा सुरू आहे. आरसीएफचा थळ-वायशेत प्रकल्प सुरू झाल्यानंतर या परिसरात इंग्रजी माध्यमाची शाळा नसल्याने आरसीएफ कर्मचार्‍यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शाळा सुरू करण्यात आली. शाळा चालविण्याचे संपूर्ण दायित्व डेक्कन एज्युकेशन सोसायटीने घेतले. मात्र 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून या शाळेसंदर्भात आरसीएफसोबत कराराचे नूतनीकरण करण्यास डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी अनाकलनीय कारणांनी असमर्थता दाखविली. शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यादृष्टीने करार किमान दोन वर्षे मुदतीने पुन्हा करण्यात यावा म्हणून डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांना आरसीएफ व्यवस्थापनातर्फे लेखी स्वरुपात वारंवार विनंत्या केल्या. मात्र कराराचे नूतनीकरण न करण्याबाबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी, पुणे ठाम राहिली.

शाळा पुर्ववत सुरू करण्याची मागणी विभागीय शिक्षण संचालकांकडे आरसीएफ व्यवस्थापनाने लेखी पत्राद्वारे केली. या पत्राची दखल घेत कार्यवाही करण्याची सुचना शिक्षणाधिकारी यांना दिली. त्यानुसार रायगड जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीला पत्र दिले असून शाळा पुर्ववत सुरु ठेवावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दोन दिवसात सादर करावा अशी लेखी सुचना देण्यात आली आहे. शिक्षण विभागाने डेक्कनला फटकारले आहे. त्यामुळे आरसीएफची शाळा पुर्ववत सुरु राहणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिक्षण विभागासह आरसीएफ प्रशासनाकडून केलेल्या सहकार्यामुळे आरसीएफ शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यामुळे पालक वर्गांसह विद्यार्थ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Exit mobile version