अजिंक्यतार्‍यावरून शिवज्योत दौड प्रस्थान

230किलोमीटर अंतर दौडत पार करणार

| नेरळ । वार्ताहर ।

नेरळ येथील शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील गडकिल्ल्यावरून शिवज्योत आणली जाते. यावर्षी जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावरून शिवज्योत घेवून शिवप्रेमी तरुण निघाले असून 10 मार्च रोजी नेरळ येथे सकाळी पोहचणार आहेत. दरम्यान, नेरळ येथील 20 तरुणांचे पथक ही शिवज्योत अजिंक्यतारा किल्ला येथून निघाले असून 230 किलोमिटर अंतर पार करून नेरळ येथे पोहचणार आहेत.


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी केली जाते. येथील शिवजयंती उत्सव हा गेली 55 वर्षे नेरळ ग्रामस्थ यांच्या माध्यमातून सार्वजनिक शिवजयंती उत्सव सोहळा साजरा केला जातो. या निमीत्ताने नेरळ येथील शिवप्रेमी तरुण श्याम कडव आणि प्रथमेश कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यावरुन शिवज्योत पायी धावत येत असतात. गतवर्षी या तरुणांनी नाशिक जिल्ह्यातील रामशेज या कल्ल्यावरून शिवज्योत घेवून नेरळ येथे पोहचले होते.

यावर्षी निवडलेल्या अजिंक्यतारा हा किल्ला सातारा जिल्ह्यातील असून तेथून नेरळ हे अंतर 230 किलोमीटर एवढे प्रचंड आहे. हे सर्व शिवप्रेमी तरुण रात्रभर धावत असतात आणि दिवसभर विश्रांती घेवून पुन्हा सायंकाळ झाली की पुढचा प्रवास सुरू करतात. नेरळमध्ये तिथीप्रमाणे शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. 7मार्च रोजी हे सर्व तरुण सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर जावून तेथे शिवआरती करून सर्व तरुण नेरळकडे प्रस्थान करण्यासाठी निघाले. या शिवज्योत दौडी मध्ये श्याम कडव, भूषण भोईर, राहुल साळुंके, प्रथमेश कर्णिक, रुपेश चव्हाण, राजेश हाबळे, चिन्मय पवार, प्रथमेश देशमुख, कुणाल कांबरी, कामेश कांबरी, सुदर्शन भोईर, भावेश भोईर, दुर्वांकुर पवार, वैभव कांबरी, वेदांत भोईर असे शिवप्रेमी तरुण सहभागी झाले आहेत.

Exit mobile version