मानवनिर्मित वणव्यांमुळे वनसंपदा बेचिराख

पर्यावरणप्रेमीकडून कारवाईची मागणी, वनविभागाकडून केला खर्च वाया,
| उरण । वार्ताहर ।
मानवनिर्मित वणव्यांच्या आगीत उरणमधील जंगले जळत आहेत. वणव्यांमुळे हजारो हेक्टरवरील वनसंपदा जळून खाक होत असून आगीमुळे वन्यप्राणी आणि पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला आहे. वणवे रोखण्यासाठीच्या उपाययोजनांसाठी वन विभागाकडून केला जात असलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात असल्याचे समोर येत आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडे कृती आराखडा नसल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून केला जात आहे. वन विभागाकडे अपुरे मनुष्यबळ आणि अद्ययावत तांत्रिक साह्य नसल्याने जंगले जळून खाक होत आहेत.

वणवे रोखण्यासाठी जंगल क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये जनजागृती आणि वनपाल-वनरक्षक स्तरावरील वनकर्मचार्‍यांना पुरेसे मनुष्यबळ आणि अद्ययावत यांत्रिक साह्य उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरवर्षी साधारणपणे मार्च महिन्याच्या सुरुवातीला जंगलाला मानवनिर्मित वणवे लावण्यास सुरुवात होते. वणव्यांमुळे वनसंपदा व पशु-पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अनेक प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही अडचणीत सापडल्या आहेत.

चौकट उपाययोजनांसाठी खटाटोप वणव्यांपासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी दरवर्षी वन विभागामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत असतात. वनपाल, वनरक्षक आणि वनमजुरांच्या माध्यमातून जंगलात गस्त घालून लक्ष ठेवले जाते. वणव्यांची आग जंगलात पसरू नये यासाठी झाडांखाली पडलेला पाळा-पाचोळा चर पद्धतीने हटवणे, वणवे विझवण्यासाठी वन कर्मचार्‍यांकडून स्थानिक ग्रामस्थांचे साह्य घेतले जाते. वाहनचालकांकडून रस्त्यालगत लावलेली आग पसरू नये यासाठी जंगल क्षेत्रातून जाणार्‍या रस्त्यालगतचा पाळापाचोळा जमा करून जाळून टाकला जातो. या उपाययोजना करण्यासाठी वनविभागाकडून मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो.

Exit mobile version