वणव्यात नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास


| रत्नागिरी | वृत्तसंस्था |

डिसेंबरात वणव्यांचा आगडोंब उसळू लागला आहे. हे मंडणगड तालुक्यातील दरवर्षीचे चित्र यावर्षीही दिसू लागले आहे. उन्हाच्या तीव्रतेबरोबर डोंगरांवर वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. कारवाई व उपाययोजना होत नसल्याने वणव्यात दुर्मिळ वनसंपदेसह खासगी व सार्वजनिक संपत्तीचे लाखोंचे नुकसान होते. दरवर्षी सुमारे 20 हेक्टरचा परिसर आगीत जळून खाक होतो आहे. आजपर्यंत हजारो हेक्टरचे क्षेत्र यात नष्ट झाले आहे. ऐन हंगामात आंबा, काजूला याचा फार मोठा फटका बसत आहे.

तालुक्यात डोंगर उताराची जमीन गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे. याचबरोबर सर्व प्रमुख व उप रस्त्यांशेजारी डोंगरावर वनविभागाच्या सामाजिक वनीकरण विभागाचे वतीने वृक्षलागवड करण्यात आली आहे. मात्र दरवर्षी डोंगरावर लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी लावलेली झाडे, औषधी वनस्पती, लहान पक्षी, प्राणी पडतात. ऐन हंगामात आंबा, काजू तसेच रानमेव्याची मोहरलेली झाडे होरपळली जात असल्याने आर्थिक फटका बसून मोठे नुकसान होते. पंचनामे होतात पण नुकसान भरपाई मिळत नाही. दरवर्षी वणवा लागत असल्याने ही आग जाणीवपूर्वक लावली जाते की, अचानक लागते याचे कोडे अद्याप सुटलेले नाही. महसुल विभाग आगीनंतर नुकसानीच्या पंचनाम्याचे सोपस्कर पुर्ण करतो मात्र नुकसान भरपाई निकषात बसत नाही. या वणव्यामुळे ही जंगले नष्ट होण्याची भीती पर्यावरण मित्रांनी व्यक्त केली आहे.

रस्त्यालगत वणवे
चार महिन्यात काजू, आंब्याचे उत्पादन घेवून कुटुंबाचे आर्थिक गणित शेतकऱ्यांकडून आखले जाते. मात्र वणव्यात मोहर जळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. तसेच झाडेही होरपळून गेल्याने ती जगण्याची शक्यता कमी होते. तुळशी, पाले, माहू, सावरी, पणदेरी, उमरोली, कोन्हवली, पाट, कोंझर, कुडुक, नारगोली, पालवणी, जावळे, आंबवली, म्हाप्रळ अशा तालुक्यातील सर्वच परिसरात, रस्त्यालगत वणवे पेटत आहेत.




Exit mobile version