| गणपतीपुळे | प्रतिनिधी |
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथे गेल्या चार दिवसांपासून समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. सध्या गणपतीपुळे किनाऱ्यावर जयगड पोलीस ठाण्याच्या वतीने मोठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. त्यांच्या जोडीला जीवरक्षक व स्थानिक व्यावसायिक मोठी मेहनत घेत आहेत. किनाऱ्यावर वाढलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना सूचना देण्याचे काम सर्वच यंत्रणांकडून होत आहेत. याबाबत गणपतीपुळे देवस्थान समिती आणि गणपतीपुळे पोलीस यंत्रणेकडून खास पर्यटकांना समुद्राच्या धोक्याबाबत ध्वनिक्षेपकावरून सूचना दिल्या जात आहेत. एकूणच गेल्या चार दिवसांत बुडणाऱ्या पर्यटकांच्या घटनेला पर्यटकांचा अतिउत्साह, बेजबाबदारपणा आणि हलगर्जीपणा जबाबदार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. स्थानिक व्यावसायिकांच्या जीवरक्षक व पोलिसांच्या सूचनाकडे पर्यटकांचे दुर्लक्ष होत असल्याने सध्या या घटना घडू लागल्या आहेत.







