एसटी बंदमुळे डेपोतील व्यावसायिकांवर उपासमारी

। अलिबाग । नेहा कवळे ।
‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद वाक्य घेऊन धावणारी लालपरी सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याची आहे. मात्र, राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी पुकारलेल्या आंदोलनास रायगडातील डेपोमधून पाठिंबा देण्यात आला. काम बंद आंदोलनात अलिबाग आगारातील चालक, वाहक, डेपोतील अधिकारी, क्लार्क यांनी सहभाग घेतला आहे. अलिबाग बसस्थानकामध्ये असलेल्या गोळ्या, बिस्किटं, फळे विकणार्‍या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
सध्या अलिबाग आगारातून तीन ठिकाणच्या एसटी बसेस सोडल्या जात आहेत. तरीही आगारात पहिल्यासारखी गर्दी दिसून येत नाही. सर्व एसटी बसेसच्या सेवा सुरू झाल्या नसल्याने प्रवासी बसस्थानकाकडे फिरकत नाहीत. बसस्थानकात शुकशुकाट असल्याने उपाहारगृह, चहा कॅन्टीन, पान टपर्‍या, फळे विक्रेत्या करणार्‍या महिला आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागातून अलिबाग शहरामध्ये व्यवसायासाठी येणार्‍या छोट्या व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत आहेत. दररोज सकाळी नेहमीच्या बसने अलिबाग शहरात विक्रीसाठी माल घेऊन येणार्‍या व्यावसायिकांची बस बंदमुळे मोठी अडचण झाली आहे. दुचाकी किंवा अन्य वाहन नसल्याने या व्यावसायिकांना खासगी वाहनात जादा दर देऊन अलिबागला यावे लागत आहे. खासगी वाहनांनीही संधीचा फायदा घेत नेहमीपेक्षा दर वाढवले आहेत. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांचा जीव मेटाकुटीला आला आहे.

रिक्षाचालकांचा व्यवसाय ठप्प
अलिबाग डेपोमध्ये उतरणार्‍या प्रवाशांना विविध ठिकाणी पोहोचविणार्‍या बसस्थानक परिसरातील रिक्षाचालकांचा व्यवसायही ठप्प झाला आहे. पहिल्या दिवसभरात सात ते आठ वेळा नंबर येत असे. परंतु, आता एसटी संपामुळे प्रवासी नसल्यामुळे दिवसभरात कधी दोन ते तीन वेळाच नंबर येतो. त्यामुळे आता शहरात फिरून रिक्षा चालक व्यवसाय करीत आहेत.

पूर्वी लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडला होता. आता कुठे सर्वकाही पूर्वपदावर येत असताना, एसटी कर्मचार्‍यांनी केलेल्या संपामुळे बाहेरुन येणार्‍या प्रवाशांची ये-जा कमी आहे. त्याचा परिणाम व्यवसायावर झाला असून, आर्थिक संकट ओढावले आहे. – शरद राऊत, अध्यक्ष, रिक्षा संघटना

बसमध्ये फळे विकून चार पैसे मिळतात. त्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, एसटीच्या संपामुळे माझा व्यवसाय मागील अनेक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. – आशा पाटील, फळविक्रेती

Exit mobile version