मातृवंदना योजनेच्या लाभापासून वंचित

| पोलादपूर | प्रतिनिधी |

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभापासून पोलादपूर तालुक्यातील अनेक महिला वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सदरच्या महिलांचे अपत्य हे आता एक वर्षाचे झाले तरी, सरकारी लाभ पदरात पडलेला नाही. वेबपोर्टलवर अन्य माहिती भरण्यात येत असल्याचे सरकारी कारण पुढे करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

देशातील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रयरेषेवरील महिलांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत राज्यात 1 जानेवारी 2017 पासून तीन टप्प्यात 5 हजार रूपये रकमेचा लाभ थेट बँक अथवा पोस्टाच्या खात्यात जमा केला जाण्याचा शासननिर्णय 7 डिसेंबर 2017 पासून अंमलात आला. राज्यात सरकारी रूग्णालयामध्ये गर्भवती महिलेने नोंद केल्यानंतर वेबपोर्टलवरून आशा सेविका अथवा फिड फंक्शनरी यांनी सदर महिलेची माहिती अपलोड करायची आहे, असे सांगण्यात आले. पोलादपूर शहरातील गर्भवती आणि प्रसुती झालेल्या महिलांसह तालुक्यातील अनेक गर्भवती आणि प्रसुती झालेल्या महिलांची माहिती या वेबपोर्टलवर अपलोड करण्यात वेबपोर्टलवर अनेक अडचणी आल्याने दुसऱ्या वेबसाईटवरून माहिती अपलोड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात पोलादपूर शहर हे पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील धामणदिवी येथील आरोग्य उपकेंद्राच्या अख्त्यारीमध्ये येते. यादरम्यान, पोलादपूर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या कार्यालयात महिला लाभार्थ्यांची माहिती नव्याने अपलोड केली जात असल्याचे सांगण्यात आले. 2020 पासून आतापर्यंत अनेक महिलांना उडवाउडवीची, वेबपोर्टलमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने पुन्हा माहिती अपलोड करावी लागल्याची तसेच तुमचे बँक खाते तपासून बघा, अशी मोघम उत्तरे देण्यात आली आहेत.

Exit mobile version