| नेरळ | प्रतिनिधी |
प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमधून शासनाकडून पहिल्या अपत्यासाठी महिलांना पाच हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाते. कर्जत तालुका आरोग्य खात्यामार्फत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे काम पाहिले जाते; मात्र या कर्मचार्यांनी मागच्या कित्येक वर्षात आशा सेविकांकडून आलेले योजनेचे फॉर्म ऑनलाइन करण्याची कार्यवाही झालेली नाही, त्यामुळे तालुक्यातील सात हजार 700 महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आहेत, अशी माहिती माहिती अधिकारात समोर आली आहे.
कर्जत तालुका आरोग्य खात्याकडे व जिल्हा आरोग्य खाते रायगड जिल्हा परिषद यांच्याकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविण्यात आली होती; 2017 ते मार्च 2023 पर्यंत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचे एकूण 5,392 महिलांचे फॉर्म मिळाल्याचे आणि त्यातले 4,834 फॉर्म ऑनलाइन केल्याची माहिती तालुका आरोग्य खात्याकडून माहितीच्या अधिकारात दिली होती. आशा सेविकांकडील रजिस्टरच्या झेरॉक्स माहितीच्या अधिकारात मागितल्यानंतर जवळपास 10 हजार 481 महिलांचे फॉर्म तालुका आरोग्य खात्याकडे दिल्याचे दिसून येते. मात्र, संबंधित कर्मचार्याने आतापर्यंत फक्त 4,834 फॉर्म ऑनलाइन पूर्ण केले आहेत. कर्जत तालुक्यात मातृवंदना अनुदानासाठी अर्ज करणार्या महिलांची संख्या 5392 असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे. कर्जत तालुक्यात नाही तर, देशात या योजनेचे सर्वर फेब 2023 मध्ये बंद झाले ते नॉव्हेंबर 2023 मध्ये पुन्हा सुरु झाले. त्यामुळे त्या नऊ महिन्यांत कोणत्याही अर्जदाराचे अर्ज संपूर्ण देशात ऑनलाईन होऊ शकले नव्हते.
आशा सेविकांकडे रजिस्टरची पूर्ण माहिती तालुका आरोग्य खात्याकडून अजूनपर्यंत दिली नसल्याने हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. मात्र, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वापरण्यात येणार्या पोर्टलची समस्या आहे. त्यात कोणत्याही विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा हस्तक्षेप नसतो. शासनाचे पोर्टल काम करीत नसल्याने केवळ कर्जत तालुक्यात नाहीतर राज्यातही संशय कायम आहे. सर्व अर्जदार माता यांना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाचा आहे, अशी माहिती खुद्द रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांच्या कार्यलयाकडून देण्यात आली आहे.
मात्र, आता लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने महिलावर्गाने मोठ्या प्रमाणात आपले आधार कार्ड आपल्या बँकेतील खात्याला लिंक करून घेतले आहेत. त्याचा दुसरा परिणाम मातृवंदना योजनेतील लाभार्थी यांचे ऑनलाईन होऊ शकले नसलेले अर्ज आता यशस्वीरित्या ऑनलाईन होऊ लागले असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे मातृवंदना योजनेचे अनुदान अनेक लाभार्थी यांना मिळू लागले असल्याचे दिसून आले आहे.