| कोर्लई | वार्ताहर |
तीन जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात मुरुडच्या तहसील कार्यालयाजवळ वनविभाग, ट्रेझरी, सेतु कार्यालय इमारतीवर पडलेला मोबाईल टॉवर अखेर चार वर्षांनंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांच्या पाठपुराव्यानंतर काढण्यात आला.
राज्यात गेल्या चार वर्षांपूर्वी झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा मुरुडलाही मोठ्या प्रमाणावर बसून नुकसान झाले होते. येथील तहसील कार्यालयानजीक वनविभागाच्या वायरलेस टॉवर कोसळला होता. हा टॉवर हटविण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते जनार्दन कंधारे, समाज सेवकांकडून मागणी करण्यात आली होती. पावसाळ्यात याठिकाणी कोणती एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण, असा सवालही नागरिकांतून विचारला जात आहे.
तालुक्यातील महत्त्वाचा दुवा असलेली तहसील कार्यालय, वनविभाग, ट्रेझरी, सेतु, मंडळ व तलाठी कार्यालय येथे असून, नेहमी गजबजलेली असतात. दूरवरुन ग्रामीण भागातून आलेल्या लोकांची आपल्या कामासाठी लगबग असते. निसर्ग चक्रीवादळ होऊन चार वर्षे होऊनही या पडलेल्या टॉवरकडे शासनाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष दिसून येत होते. याठिकाणी वेळप्रसंगी अपघाताची शक्यता लक्षात घेऊन, तातडीने दखल घेऊन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत होती. अखेर चार वर्षांनंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज वाघमारे यांच्या पाठपुराव्यानंतर हा पडलेला टॉवर हटविण्यात आला.