रोहयो’मधून अंमलबजावणी केल्यास शेतकर्यांचे कल्याण
| पोलादपूर | शैलेश पालकर |
कोकणातील शेतकर्यांची जमीन दुर्गम, तीव्र उताराची आणि कमी आकाराच्या बांधा-बांधांची असल्याने या शेतजमिनीला जलसिंचनासाठी मोठी शेततळी घेणे शक्य होत नव्हते. म्हणून पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे सर्वात आधी छोट्या आकाराचे शेततळे बांधण्यात आले. या शेततळ्याला महाराष्ट्र शासनाकडे जलकुंड नावाने प्रस्ताव करण्याइतपत एकाच गावात 22 जलकुंडांचे काम केले. शुक्रवार, दि. 3 जानेवारी रोजी राज्य सरकारच्या कृषी आयुक्तालयाने परिपत्रक काढून ‘जलकुंडाचा गोळेगणी पॅटर्न’ला कोकणातील पाचही जिल्ह्यांसाठी राबविण्यास मान्यता दिली असून, तो गोळेगणी गावाच्या नावाने ओळखला जाणार आहे.
2019 मध्ये पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी या टंचाईग्रस्त गावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातील शेतकर्यांनी आंबा व काजू या फळपिकांची लागवड केली. लागवड केलेल्या कलमांना डिसेंबर ते मे या कालावधीत संरक्षित पाणी देण्याकरीता कृषी सहाय्यक मनोज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव येरुणकर यांच्या शेतामध्ये 5 मी. लांब 5 मी. रूंद आणि 2 मी. खोल अशा आकारमानाचे 1:0.50 उताराच्या जलकुंडाचे खोदकाम केले व त्याला 500 मायक्रॉन जाडीचे प्लास्टिक अस्तरीकरण करुन 52 हजार 731 लीटर संरक्षित पाणीसाठा करण्यात आला. जलकुंडात उपलब्ध झालेले पाणी लागवड केलेल्या कलमांना संरक्षित पाणी म्हणून वापर केल्याने कलमे जगण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले.
यानंतर टंचाईग्रस्त गोळेगणी या गावामध्ये विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग ठाणे अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली व तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, उपविभागीय कृषी अधिकारी महाड बालाजी ताटे, तत्कालीन तालुका कृषी अधिकारी पोलादपूर सूरज पाटील, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, कृषी सहायक देवपूर मनोज जाधव यांच्या तांत्रिक मार्गदर्शन व जनजागृतीमुळे गोळेगणी गावातील नामदेव येरुणकर, गणपत पवार, शेखर येरुणकर, अविनाश येरुणकर, प्रकाश येरुणकर, दीपक मोरे, ज्ञानेश्वर मोरे, राजेंद्र दळवी, अनिकेत मोरे, सागर मोरे, विमल मोरे, मंदा सुर्वे, मधुकर मोरे, बाळकृष्ण मोरे, दशरथ मोरे, दीपक मोरे, नितीन मोरे, दिपक कदम, रामदास मोरे, तुटवली गणेश मोरे, राजाराम शिंदे, मोरगिरी, दगडू ढेबे, मोरगिरी या शेतकर्यांच्या स्वयंप्रेरणेने 22 जलकुंडांचे काम पूर्ण करण्यात आले. या जलकुंडांच्या कामाला पत्रकार शैलेश पालकर यांनी सातत्याने तसेच वेळोवेळी प्रसिध्दी देऊन शेतकर्यांना प्रेरणा दिली. याकामी देवेंद्र दरेकर तसेच प्रकाश कदम या पत्रकारांनीही प्रसिध्दी दिली.
कोकणातील जमीनधारणा क्षेत्र सरासरी 1 हेक्टरपेक्षा कमी आहे. कोकण विभागात सरासरी पर्जन्यमान 3500 ते 4000 मि.मी. असून, कोकण विभागातील हवामान आंबा, काजू व इतर फळपिकास पोषक आहे. कोकण विभागात दरवर्षी विविध शासकीय योजना, सामाजिक संस्था तसेच वैयक्तिक शेतकरी यांच्याकडून आंबा व काजू या फळपिकांची लागवड मोठ्य प्रमाणात करण्यात येत असून, फळबागा जिवंत राहण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. याचे प्रमुख कारण म्हणजे, कोकणातील जमिनी डोंगर उताराच्या व कातळ भाग असल्यामुळे लागवडीनंतर सुरुवातीच्या तीन वर्षांच्या कलमे रोपांना डिसेंबर ते मे या महिन्यांच्या कालावधीत संरक्षित पाणी देण्याची सुविधा पुरेशा नसल्याचे दिसून येते.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांनी कोकणातील फलोत्पादन पिकासाठी जलकुंड या उपचारास तांत्रिक शिफारस केलेली असून, या अनुषंगाने मा. संचालक, मृद व जलसंधारण यांच्याकडून शासनास सादर केलेल्या जलकुंड प्रस्तावास मृद व जलसंधारण विभागाच्या दि. 27 नोव्हेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये कोकण विभागासाठी डोंगराळ भाग कातळामध्ये यंत्राद्वारे जलकुंडाचे काम करण्याचे मापदंड मंजूर केलेले आहेत.
प्रोत्साहनाची आवश्यकता
राज्य सरकारच्या कृषी आयुक्तालयाने याबाबतचे अधिकृत परिपत्रक दि.3 जानेवारी 2025 रोजी जारी केले असल्याने कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये जलकुंडनिर्मितीस राज्य सरकारचे प्रोत्साहन मिळणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन मंडळ, मनरेगा असे पर्याय उपलब्ध असून, जलकुंडनिर्मितीसाठी गोळेगणी गाव ज्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहे; त्या रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी शेतकर्यांना रोहयोतून जलकुंडनिर्मितीसाठी भरघोस प्रोत्साहन दिल्यास शेतकर्यांचे कल्याण साधले जाणार आहे.
डोंगराळ भागात फायदेशीर
शेततळ्याचे आकारमान तसेच त्याकरिता येणारा खर्च या बाबींचा विचार करता कोकणातील दुर्गम व डोंगराळ, कातळ भागात शेततळे खोदणे शक्य नाही, अशा जागेवर हा जलकुंड उपचार फायदेशीर असून, 5 मी. लांब 5 मी. रूंद आणि 2 मी. खोल आकारमानाचे जलकुंड कोकणातील सर्वसामान्य फळबाग शेतकर्यांसाठी वरदान ठरत आहे.
लवकरच जलकुंडनिर्मितीसाठी सहभाग घेणार्या व ‘जलकुंडाचा गोळेगणी पॅटर्न’ तयार करणार्या शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, पत्रकार व लोकप्रतिनिधी यांचा सर्वांचा गौरव करून गोळेगणीचे ग्रामस्थ जल्लोष करणार आहेत.
प्रकाश दळवी,
सरपंच