| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात आरोग्य सुविधांच्या अभावाचा फटका पुन्हा एकदा एका तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. कर्जत येथे चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने पनवेल येथे रुग्णाला न्यावे लागते आणि त्याचा फटका योगेश वैद्य यांना बसला.
कर्जत शहारातील एक व्यावसायिक योगेश वैद्य हे प्रकृती खालावल्याने अस्वस्थ झाले. त्यांनतर ते नेहमीच्या क्लीनिकमध्ये गेले, तेथून त्यांना पुढील उपचारासाठी पनवेलला जाण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार योगेश वैद्य आपल्या मित्रासोबत पनवेलच्या दिशेने निघाले. मात्र, शेडुंग टोलनाक्याजवळ पोहोचताच त्यांची प्रकृती आणखी खालावली. पनवेलमधील हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यापूर्वीच त्यांनी गाडीतच अखेरचा श्वास घेतला होता. कर्जतमध्ये एक सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र, स्थानिक नेत्यांनी आणि प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. वैद्य यांच्या मृत्यूनंतर या विषयाला पुन्हा एकदा समोर आला आहे. नागरिकांनी प्रशासन आणि नेत्यांवर टीका करत कर्जतमध्ये अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आरोग्यविषयक सोयींसाठी पनवेल, मुंबई किंवा पुण्याचा आधार घेणे ही लांबच्या प्रवासामुळे रुग्णांसाठी जीवघेणी बाब ठरते आहे. योगेश वैद्य यांचा मृत्यू ही कर्जतमधील आरोग्याच्या हलगर्जीची आणखी एक घटना आहे. भविष्यात असे बळी जाण्यापासून वाचवण्यासाठी, प्रशासनाने आणि स्थानिक नेत्यांनी कर्जतमध्ये एक प्रगत आरोग्यसेवा केंद्र उभारण्यावर प्राधान्याने काम करणे गरजेचे आहे.