वावळोली आदिवासीवाडी स्मशानभूमीपासून वंचित

उघड्यावर करावे लागते प्रेतांचे दहन
पाली/बेणसे | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या 74 वर्षांनंतरही सुधागड तालुक्यातील वावळोली आदिवासीवाडी ग्रामस्थ हक्काच्या स्मशानभूमीपासून वंचित आहेत. वन विभागाच्या हद्दीतील जागेत दगडावर सरण रचून उघड्यावर अंतिम संस्कार करावे लागत आहेत. त्यामुळे मृतदेहाची हेळसांड होते. आजही आदिवासी बांधवांना विविध समस्यांनी ग्रासले आहे. जीवन जगताना पावलोपावली संघर्ष करावा लागतोय, मरणानंतरही दुःख आणि दुःख त्यांच्या वाट्याला दिसते, हे भयानक वास्तव समोर आले आहे.

पावसाळ्यात तर फारच गैरसोय होत आहे. चिखलातून मृतदेह जंगलात न्यावा लागतो. पाऊस सुरू झाल्यावर अंतिम संस्कारासाठी थांबावे लागते. शिवाय, मध्येच पाऊस आल्यास प्रेताचे अर्धवट दहन होते. लाकडे भिजतात, मग पुन्हा पुन्हा दहन करावे लागते. असे किती वर्षे करावे लागणार? यामुळे येथील नागरिक प्रचंड संतापले आहेत, असे महादू वाघमारे याने सांगितले. मागील तीन वर्षांत सिद्धेश्‍वर ग्रामपंचायत हद्दीत आदिवासीवाडी, प्रबुद्ध नगर आणि कासारवाडी अशा तीन शेड बसवण्यात आल्या, खांडसई आदिवासीवाडी स्मशानभूमी चौथरा बांधला, खांडसई शेड मंजूर आहे. मात्र, निधीअभावी वावळोली आदिवासीवाडीची स्मशानभूमी होऊ शकलेली नाही.

वावळोली आदिवासीवाडी स्मशानभूमी जागा वनविभाग हद्दीत आहे. त्यासाठी सुधागड वनविभागाकडून सहकार्य मिळत आहे. सर्व कागदपत्र तयार केले आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांपासून निधीची कमतरता असल्याने काम होऊ शकली नाहीत. सिद्धेश्‍वर गाव, वावळोली या दोन स्मशानभूमी शेडचे प्रस्ताव गेले आहेत. त्यासाठी पाठपुरावा चालू आहे.
उमेश यादव, सरपंच, सिद्धेश्‍वर

Exit mobile version