ठेकेदाराकडून नियमित कामाची महाडकरांना अपेक्षा
| पोलादपूर | प्रतिनिधी |
शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीचा गाळ उपसण्यास सुरूवात झाली आहे. सध्या तरी अनियमितपणे या नदीपात्राचा गाळउपसा सुरू आहे. तरी, ठेकेदाराच्या कमाईपुरताच गाळउपसा नको, तर 2005च्या महापुरात गंगामाता घाटावरील वाहून गेलेली नंदीची पाषाणमूर्ती आणि रेजना व दगडगोटे काढण्याची मागणी महाडकरांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, पूरप्रतिबंधक प्रयत्नांचा लवलेशही याठिकाणी दिसून येत नाही. 2021 साली आलेल्या महापुरामध्ये पोलादपूर आणि चरईच्या नदीपात्रालगतच्या परिसरात सुमारे 25 फूट उंच पूररेषा निर्माण झाली असताना गाळाचा उपसा करून नदीपात्राची खोली अधिकाधिक वाढविण्यासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षाही व्यक्त होत आहे.
पोलादपूर शहरातील श्रीदेवी गंगामाता घाटावरील नंदीची पाषाणमूर्ती 2005च्या अतिवृष्टीमुळे उत्तरवाहिनी सावित्री नदीला आलेल्या महापुरामध्ये वाहून गेली. यानंतर अनेकवेळा आलेल्या महापुरामुळे पोलादपूर येथील उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र उथळ होत गेल्याने दरवर्षी येणार्या महापुराने पूररेषेचा उच्चांक प्रस्थापित केला. 2021 सारखी पूरपरिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून राज्य सरकारने आपत्ती निवारण आणि गौणखनिज उत्खनन खात्यामार्फत नदीपात्रातील रेजगा आणि गोटे यांचा उपसा करण्याची कंत्राटे देऊन ठेकेदारही नेमले आहेत.
पोलादपूर शहरातील गणेशमंदिरापासून ते समोरच्या चरई साळवीवाडीपर्यंत रूंदावलेल्या सावित्री नदीच्या पात्रातून दुथडी भरून वाहणार्या महापुरामुळे चरई येथील पुलाचा अॅप्रोच रोडदेखील आतापर्यंत चार वेळा वाहून गेला आहे. चरई पुलाचे कठडेही वाहून गेल्याने पुलावरून दरवेळी पाणी वाहू लागणे पुलाला धोकादायक ठरणार असल्याने यावर्षी होणार्या गाळउपशामुळे पुलाखालून पाणी वाहू लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दुसरीकडे, केवळ ठेकेदाराच्या ठेकेदाराच्या कमाईपुरती नाही, तर 2005मध्ये वाहून गेलेली श्रीदेवी गंगामाता घाटावरील नंदीची पाषाणमूर्ती मिळेपर्यंत नदीपात्राचा उपसा होण्याची आवश्यकता आहे. गंगामाता घाटाजवळील हत्तीडोहामध्ये ही नंदीची पाषाणमूर्ती आढळून येण्याची शक्यता अनेकांनी वर्तविली आहे.
महसूलचे दुर्लक्ष?
सावित्री नदीपात्रात ठिकठिकाणी रेजगा व गोटे काढण्यासाठी यंत्रसामुग्रीचा वापर सुरू झाला आहे. मात्र, या उपशाबाबत महसूल यंत्रणेचे कोणीही तलाठी, मंडल अधिकारी अथवा नायब तहसीलदार पाहणी करण्यासाठी न फिरकल्यामुळे हे काम कोणत्या कार्यालयाच्या निरीक्षणाखाली सुरू आहे, याबद्दल स्पष्टता दिसून येत नाही.