नाना उपाय, तरी टक्का घसरला

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा 2024 च्या निवडणुकीत 60 टक्के मतदान झाले असून, मागील निवडणुकांच्या तुलनेत मतटक्का घसरल्याचे दिसून आले. 2014 च्या निवडणुकीत 64 टक्के, तर 2019 मध्ये 61.77 टक्के मतदान झाले होते. दरम्यान, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आलेे. ठिकठिकाणी जनजागृती कररण्यात आली. मात्र, नाना उपाय करूनही मतटक्का वाढविण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे आकडेवारीवरुन दिसून आले आहे.

रायगड लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने कंबर कसली होती. लोकशाही अबाधित राखण्यासाठी ग्रामीण भागासह शहरी भागात ठिकठिकाणी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांपासून वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनादेखील कामाला लावले होते. गावे, वाड्यांवस्त्यांमध्ये जाऊन पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली होती. आदिवासीवाड्या वस्त्यांमध्ये मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. एक वेगळा उत्साह यानिमित्ताने जिल्ह्यात दिसून आला होता. मंगळवारी (दि.7) अलिबाग, महाड, श्रीवर्धन, पेण, गुहागर व दापोली या सहा विधानसभा मतदारसंघातील दोन हजार 185 मतदान केंद्रात मतदान झाले. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत ही प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांत मतदानासाठी गर्दी झाली होती. ज्येष्ठ नागरिकांसह महिला, तरुण मतदार या उत्सवात सहभागी झाले होते. मतदान 75 टक्क्यांपेक्षा अधिक होेण्याची अपेक्षा प्रशासनाला होती. मात्र, अनेक उपाय करूनहीदेखील मतदानाच्या टक्क्यात वाढ झाली नसल्याचे दिसून आले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा चार टक्क्यांनी मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version