सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळयावर पट्टी; ग्रामस्थांची पाचव्यांदा तक्रार
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील मिळकतखार परिसरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कांदळवन तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार वरुण गोविंद वासवाणी, रवी हरिकिसन वासवाणी, मोहित जनक वासवाणी (मालक) तसेच कंत्राटदार जितेंद्र जयराम बेर्डे (पार्थ कन्स्ट्रक्शन) यांनी सरळपणे 2 ते अडीच एकर क्षेत्रातील कांदळवनाची कत्तल करून अनधिकृत भराव केला आहे.
गेल्या काही वर्षात या प्रकरणात अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच माती वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे बनावट पास बनविल्याबद्दल तहसिलदार यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र, तहसिलदार गुन्हे दाखल करण्याऐवजी वाहतूक विभागाला पत्र पाठवून हे प्रकरण नाहक लांबवून गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची चर्चा जोर धरीत आहे.
परिणामी, प्रशासनाच्या आशिर्वादाने येथे वारंवार कांदळवन तोड होत असल्याचा आरोप ग्रामस्थ विनय कडवे व जगदिश म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणात प्रशासनाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया व नियमांची पायमल्ली झाली असून, अधिकाऱ्यांकडून सीआरझेड नोटिफिकेशन 1991, तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या दि. 6 ऑक्टोबर 2005, दि. 27 जानेवारी 2010 आणि 17 सप्टेंबर 2018 च्या आदेशांचे उल्लंघन केले असल्याने या प्रकरणात चौथ्यांदा गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मिळकतखारमधील बहुसंख्य गट नंबर हे सीआरझेड-1 व 3 झोनमध्ये तसेच मनोरंजन व पर्यटन विभागाच्या आराखड्यातील भागात आहेत. त्यामुळे कोणत्याही सरकारी मंजुरीशिवाय बदल करणे बेकायदेशीर आहे. यापूर्वीही तीन वेळा याच प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. पण भराव माफीया या गुन्ह्यांना धूप घालीत नसून पुन्हा नव्याने अनधिकृत भराव व कांदळवन तोड करीत असल्याचे पुरावे छायाचित्रांसह ग्रामस्थांनी सादर केले आहेत.
मिळकतखार, सारळ, बागदांडा, आवळीपाडा, सांगड पाडा, मिळकतखार (मळा) या आसपासच्या गावांना बेकायदेशीर भरावामुळे पावसाळ्यात व भरतीच्या वेळेस जलप्रलयाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या पावसाळ्यातच या गावांमध्ये पाणी शिरले होते. स्वतः तहसिलदार यांनी भेट देऊन त्यावेळी पाहणी केली होती. सारळ येथे प्रस्तावित पाणीपुरवठा प्रकल्प आणि नदी पुन्हा जिवंत करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयासांवर पाणी फेरण्याची स्थिती आढळून आली आहे. या भरावामुळे परिसरात पुराचा धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांचे आरोप व मागण्या
वासवाणी कुटुंब व कंत्राटदार यांनी राजकीय वरदहस्ताचा गैरवापर करत स्थानिक कार्यालयांकडून बेकायदेशीर परवानगी मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बेकायदेशीररित्या केलेला भराव हटवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच दोषी व्यक्तींवर तसेच तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावरही कठोर कारवाई करा. या भरावाच्या ठिकाणी पुढील कुठल्याही बांधकामास थेट बंदी घाला. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या कांदळवनांचा विनाश रोखण्यासाठी तातडीने सरकारी यंत्रणांनी उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे.







