बंदीवान साधणार नातेवाईकांशी संवाद

तळोजा कारागृहात व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधा

| पनवेल | वार्ताहर |

कारागृहात बंदिस्त असलेल्या बंदीवानांना भेटण्यासाठी नातेवाइकांना तासनतास उभे राहावे लागत होते. मात्र, आता नातेवाइकांना ई-मुलाखतीच्या माध्यमातून थेट वीस मिनिटे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलता येणार आहे. या उपक्रमाचे उद्घाटन सोमवारी(दि. 4) राज्याचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते तळोजा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले. यावेळी अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, तळोजा कारागृहाचे अधीक्षक प्रमोद वाघ, तुरुंग अधिकारी राहुल झुताळे आदी उपस्थित होते.

राज्यातील कारागृह हे केवळ शिक्षा भोगण्याचे ठिकाण नसून कैद्यांनाही सुधारण्याची संधी मिळावी, यासाठी राज्याचे गृह खाते आणि कारागृह प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याअनुषंगाने राज्यभरातील कैद्यांना दिल्या जाणार्‍या सुविधा हायटेक करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. त्यानुसार कैद्यांना कारागृहातच बायोमेट्रीक टच स्क्रीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तळोजा कारागृहात कियास्क मशीन सुविधा, अ‍ॅलन सुविधा, कोर्ट शेड, ई-मुलाखत आदी युनिट सुरू करण्यात आले आहे. या सुविधेनुसार कैद्यांना आता एका क्लिकवर स्वतःच्या बाबतीतील सद्यस्थिती जाणून घेता येणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कारागृहातील बंदिस्त कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा नातेवाइकांशी बोलता येणार आहे. तर ई-मुलाखत या सुविधेमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे वीस मिनिटे संवाद साधता येणार आहे. कारागृहातील कैद्यांना त्यांच्या नातेवाइकांसोबत तसेच, त्यांच्या वकिलासोबत ऑनलाईन मुलाखती करता येणार आहे. या सुविधेच्या माध्यमातून कैद्यांच्या नातेवाइकांना व वकिलांना ई-मुलाखत अ‍ॅपद्वारे काही दिवस अगोदर मुलाखत आरक्षित करता येऊ शकणार आहे.

तळोजा मध्यवर्ती कारागृहात चारशे कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मात्र, सध्या कारागृहात जवळपास तीन हजार कैदी शिक्षा भोगत आहे. तसेच, कैद्यांच्या भेटीसाठी येणार्‍या नातेवाइकांना बाहेर तासनतास उभे राहावे लागत आहे. आता थेट व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधता येणार असल्यामुळे भेटीसाठी येणार्‍या नातेवाइकांची संख्या कमी होणार आहे.
Exit mobile version