अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधी मंचातर्फे अभियान
| पेण | वार्ताहर |
सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली; परंतु सामाजिक चालीरितींनी पुरूषप्रधान संस्कृती बळकट केली. फुले, आंबेडकर, आगरकरांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात आजही गरीब ग्रामीण व आदिवासी समाजात बालविवाह होतात. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी अंकुर ट्रस्ट व महिला अत्याचार विरोधी मंचमार्फत ‘निर्धार माझा’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
2012 च्या कुप्रसिद्ध निर्भया बलात्कार प्रकरणानंतर पेणमध्ये सामाजिक र्कार्यकर्त्या डॉ. वैशाली पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘महिला अत्याचार विरोधी मंचा’ची स्थापना करण्यात आली. या मंचमार्फत दरवर्षी अभियान राबविण्यात येते. यामध्ये लिंगभेद, जाचक रूढी व परंपरांना तिलांजली देऊन पुरोगामी विचार प्रचाराचे कार्य अंकुर ट्रस्टच्या मदतीने करण्यात येते. या वर्षात बालविवाह प्रतिबंधक कायदा व जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या विविध समित्या सक्रिय करून आदिवासी मुलींना किमान 12 वीपर्यंतचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त करणे व तसा निर्धार जाहीर करणे, हा यावर्षीच्या अभियानाचा एक भाग आहे. या अभियानात किशोरवयीन मुला-मुलींचे गट स्थापन करण्यात येत असून, यामधील सदस्य आपला स्वावलंबी बनण्याचा निर्धार करीत आहे, अशी माहिती मंचमार्फत शैला धामणकर व कविता पाटील यांनी दिली.