भारतीय फुटबॉलला यशाच्या उंचीवर नेणार
। कोची । वृत्तसंस्था ।
इंडियन सुपर लीग 2024-25 मीडिया डेचा दुसरा दिवस गुरूवारी (दि.5) कोची येथे पार पडला. यावेळी बंगळुरू एफसी, हैदराबाद एफसी, एफसी गोवा, चेन्नईयन एफसीसह गतवर्षीच्या आयएसएल चषक विजेत्या मुंबई सिटी एफसी आणि केरला ब्लास्टर्स एफसी या संघांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. यावेळी प्रत्येक संघाच्या प्रतिनिधिनींनी आगामी हंगामाबद्दल आपली मतं व्यक्त केली आहेत. आपल्या संघाच्या तयारीबाबत आणि ध्येयाबाबतही भाष्य केले. यावेळी मुंबईचे प्रशिक्षक पीटर क्रॅटकी यांच्यासह खेळाडू फुरबा लाचेनपा, जॉन टोरल, आयुष चिकारा हे उपस्थित होते.
दरम्यान, या हंगामापूर्वी राहुल भेके, अल्बर्टो नोगुएरा आणि जॉर्ज पेरेरा डियाझ या तीन प्रमुख खेळाडूंनी बंगळुरू एफसीमध्ये सामील झाल्यामुळे मुंबई सिटी एफसीने संघाचा एक छोटासा फेरबदल केला आहे. याबाबत बोलताना क्रॅटकी म्हणाले की, असे बदल होणे सामान्य आहेत. आम्ही एक नवीन अध्याय सुरू करत आहोत, म्हणूनच मी खूप उत्साहित आहे. चेन्नईन एफसीचे मुख्य प्रशिक्षक ओवेन कोयल यांनीही महत्त्वाचे भाष्य केले आहे. त्यांनी भारतीय युवा खेळाडूंच्या क्षमतेचे कौतुक केले आणि राष्ट्रीय संघ फिफा विश्वचषक पात्रतेसाठी लक्ष्य ठेवू शकेल, असेही म्हटले आहे.
यंदा केरला ब्लास्टर्स नवीन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळणार आहे. यावेळी केरला ब्लास्टर्सने मिकेल स्टाहरे यांची प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. स्टाहरे म्हणाले की, केरला ब्लास्टर्स एफसी हा मोठा चाहता वर्ग असलेला क्लब आहे. या क्लबच्या सामन्यादरम्यान स्टेडियम पूर्णपणे भरलेले असतात. मी या संघात येण्यामागील हे एक कारण आहे. आम्ही थायलंडमध्ये एका महिन्यासाठी उत्तम सुविधांसह प्रशिक्षण घेतले आणि मला याचा खूप आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेरार्ड झारागोझा यांनी गतवर्षी हंगामाच्या अर्ध्यात बंगळुरू एफसी संघाची जबाबदारी स्विकरली होती. आता संघात नवे खेळाडूही सामील झाले आहेत. याबाबत गेरार्ड म्हणाले की, आम्ही प्री-सीझनपासून खेळाडूंना साईन करून चांगले काम केले आहे. हे आमच्यासाठी यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहे. आमच्यासाठी बॉलवरच नाही, तर सामन्यांवरही वर्चस्व ठेवणे महत्त्वाचे आहे.
गेल्या हंगामात हैदराबाद एफसीची कामगिरी निराशाजनक राहिली होती. पण यंदा नव्याने सुरुवात करणार असल्याचे निर्धार मुख्य प्रशिक्षक थांगबोई सिंगटो यांनी व्यक्त केला आहे. तसेच, संघाचे जुने वैभव पुन्हा मिळवण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे. सिंगटो म्हणाले की, आमचा प्रवास खूप मनोरंजक होता, असे मी म्हणेन. त्यासाठी काही युवा खेळाडूंनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. आम्हाला पुन्हा तयारी करायची आहे आणि मजबूतीने परत यायचे आहे. मला आशा आहे की हैदराबाद एफसी देखील आयएसएल चॅम्पियन आहे हे कोणीही विसरणार नाही.
13 सप्टेंबरपासून सुरुवात
इंडियन सुपर लीगला 13 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना मोहन बगान सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई सीटी एफसी संघात होणार आहे. या लीगमधील सामने आणि 18 नेटवर्कवर पाहाता येणार आहेत.
बचावपटूचे पुनरागमन
संदेश झिंगनयंदाच्या हंगामात एफसी गोवाचा बचावपटू संदेश झिंगन गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन करत आहे. याबाबत तो म्हणाला की, एका महत्त्वाच्या टप्प्यावर, अर्धा हंगाम झाल्यानंतर मला सामन्यांना मुकावे लागले होते. तसेच, राष्ट्रीय संघासाठी महत्त्वाच्या सामन्यांना देखील मुकावे लागले होते. मी आता संघासह सराव सुरू केला आहे. मी आगामी सामन्यांमधूनच पुनरागमन करणार आहे.