स्वबळावर मराठा भवन उभारण्याचा निर्धार

किल्ले रायगडावर अलिबागचा मराठा समाज एकवटला

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

स्वबळावर मराठा भवन उभारण्याचा निर्णय अलिबागच्या मराठा समाजाने केला. किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून शपथ घेत महाराजांच्या आशीर्वादाने हा संकल्प पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अलिबाग तालुक्यातील कानाकोपऱ्यातील असंख्य मराठा बांधव किल्ले रायगडावर एकवटला.

सकल मराठा समाज्योन्नती युवा सामाजिक संस्थेच्या अंतर्गत समरेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व कार्यकारिणीच्या मार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला. तालुका कार्यकारिणी, विविध तालुका समिती, गाव संघटक, विभाग संघटक व तालुका संघटक या पदांवर तालुक्यातील विविध गावांतील समाज बांधवांची नेमणूक करण्यात आली. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कानाकोपऱ्यातून मराठा बांधव एकवटला होता.

अलिबाग तालुक्यातील पाचशेहून अधिक मराठा समाज रायगडावर बुधवारी (दि.19) दाखल झाला होता. यामध्ये महिला, तरुण मंडळींचा मोठ्या संख्येने सहभाग होता. अलिबाग तालुक्यात मराठा भवन उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्याचदृष्टीने सर्व मराठा बांधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद्स्पर्शाने व अभिषेकाने पावन झालेल्या किल्ले रायगडावर एकत्र आले. बहुउद्देशीय असा मराठा भवन बांधण्याचा निर्धार घेतला असून, त्याची सुरुवात लवकरच केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीत प्रेरक अशी ऊर्जा मराठा समाजामध्ये निर्माण झाली.

Exit mobile version