। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोव्हिड सेंटरमधून पळालेल्या कैद्याला जेरबंद करण्यात रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. हा फरार कैदी निपाणी बेळगाव येथे लपून बसला होता.पोलादपूर पोलीस ठाण्यात पोक्सो गुन्ह्यातील न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी देवा मारुती दगडे हा जिल्हा कारागृह अलिबाग येथे दाखल होता. आरोपी देवा मारुती दगडे याने न्यायालयीन कोठडीत असताना क्वारंटाईन सेलमधील खिडकीचे गज कापून 21 जुलै रोजी पलायन केले होते.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि धनंजय पोरे, पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर, सचिन शेलार, देवा कोरम, पोलीस शिपाई अक्षय सावंत यांच्या पथकाला फरार आरोपी हा जेजुरी जि.पुणे परिसरातील डोंगराळ भागात लपून बसला असल्याबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली.
त्यामुळे तपास पथकाने दोन दिवस जेजुरी, सासवड, फलटण भागात आरोपीचा शोध घेतला असता तो निपाणी जि.बेळगाव राज्य कर्नाटक येथे गेला असल्याचे समजले. आरोपी हा धनगर समाजातील असल्याने तो निपाणी येथे बाळुमामाची मेंढरे याची पुजा करण्यासाठी गेला असल्याचे पथकास समजले. त्या पथकाने निपाणी येथे जाऊन वेषांतर करुन धनगर लोकांसोबत राहुन आरोपीची माहिती प्राप्त केली.
त्या माहितीनुसार आरोपी हा नालासोपारा येथे लपून बसला असल्याचे समजले. त्यानुसार सपोनि धनंजय पोरे व त्यांच्या तपास पथकाने आरोपीचा नालासोपारा, तुळिंज परिसरात शोध घेऊन त्याला सोमवारी पहाटे ताब्यात घेतले. सदर कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, पोलीस हवालदार स्वप्नील येरुणकर, सचिन शेलार, देवा कोरम, अक्षय सावंत या पथकाने केली.