| कर्जत | प्रतिनिधी |
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात नव्याने सुरू होणाऱ्या गतिमान भात पैदास तंत्रज्ञान प्रकल्पामुळे देशाच्या अन्नसुरक्षेसह नागरिकांच्या पोषणसुरक्षेस बळकटी मिळेल, असा विश्वास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सोमवारी येथे व्यक्त केला. संशोधन केंद्राच्या विविध प्रक्षेत्र व प्रयोगशाळांना भेट दिल्यावर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते.
यावेळी डॉ. भावे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थेसोबतच्या प्रकल्पांचा तसेच विकासात्मक बाबींचा आढावा घेतला. संशोधन केंद्र जागतिक दर्जाचे होण्यासाठी सर्वच प्रकल्पांना आवश्यक निधी व तांत्रिक मनुष्यबळ वेळेवर उपलब्ध करून दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा करताना दिली. संशोधन केंद्राची मुख्य इमारत 106 वर्षांपूर्वीची असल्याने ती वारसा म्हणून जतन करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.जीवनात वक्तशीरपणा फार महत्त्वाचा असून, सर्वांनीच वेळेचे कसोशीने पालन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. संशोधन केंद्राचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी कुलगुरूंच्या सुविद्य पत्नी स्नेहल भावे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, सहा. भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई, वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी केळुस्कर, मृदा शास्त्रज्ञ डॉ. देवदत्त जोंधळे, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. राजेंद्र सावळे प्रामुख्याने उपस्थित होते.
वातावरणपूरक भात वाणनिर्मितीने अन्नसुरक्षा, पोषणसुरक्षेस बळकटी: डॉ. संजय भावे
