रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जे.एस.एम. महाविद्यालयास विकासनिधी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अलिबाग येथील जे.एस.एम. महाविद्यालयास रु. 5 लाख रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जनता शिक्षण मंडळाची नव्याने सूत्र हाती घेतल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील यांनी महाविद्यालयाच्या सुविधांच्या नूतनीकरणाचा व विकासाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आ. जयंत पाटील यांनी दिलेल्या आश्‍वासनानूसार मंगळवारी (दि.10) शेतकरी भवन येथे त्यांनी पाच लाख रुपयांचा धनादेश अ‍ॅड. गौतम पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.

यावेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.

कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर व निसर्गफ व तोक्ते चक्रीवादळांच्या तडाख्यातून सावरण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत आवश्यक आहे. या विकासकामांचा एक प्रस्ताव घेऊन अ‍ॅड. गौतम पाटील यांनी अलिकडेच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी त्या प्रस्तावाचा सहानुभतीपूर्वक विचार करून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून महाविद्यालयासाठी विकासनिधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन दिले होते.

या विकासनिधीचा उपयोग महाविद्यालयातील प्रयोगशाळा विशेषतः भाषा प्रयोगशाळेच्या विकासाठी केला जाईल, अशी माहिती प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी दिली. हा निधी उपलब्ध करून महाविद्यालयाच्या विकासात हातभार लावत असल्याबद्दल अ‍ॅड. गौतम पाटील यांनी आ. जयंत पाटील, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक व रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जनता शिक्षण मंडळाच्या वतीने आभार मानले.

Exit mobile version